News Flash

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पध्रेत यजमान सीमारेषेबाहेर

वेगवान सव्‍‌र्हिस.. जाळीजवळ तितकीच वेगवान रचली जाणारी व्यूहरचना आणि प्रत्येक गुणानंतर होणारा जल्लोष..

| April 18, 2015 08:12 am

वेगवान सव्‍‌र्हिस.. जाळीजवळ तितकीच वेगवान रचली जाणारी व्यूहरचना आणि प्रत्येक गुणानंतर होणारा जल्लोष.. हे सर्व गुरुवारपासून सुरू झालेल्या छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पध्रेत क्रीडारसिकांना पाहायला मिळत आहे; पण या सामन्याबरोबरच मुंबई उपनगर व्हॉलीबॉल असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्यातही आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगत आहे. फरक इतकाच की, हा सामना पडद्यामागे सुरू असल्याने सर्व काही आलबेल वाटत होते.  
‘‘स्थानिक संघटनेला या स्पध्रेचे काही पडलेलेच नाही, त्यांचा एकही पदाधिकारी येथे उपस्थित नाही,’’ असा आरोप करून राज्य संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी वेगवान सव्‍‌र्हिस केली. या सव्‍‌र्हिसमध्ये तथ्य होते. एरवी आपल्या घरच्या मैदानावर एखादी राज्यस्तरीय स्पर्धा होत असल्यास तेथील स्थानिक संघटनेचे पदाधिकारी यजमान म्हणून भूमिका बजावतात, परंतु तसे चित्र येथे अजिबात दिसत नव्हते. त्यामुळेच राज्य संघटनेचे सचिव बाळासाहेब सूर्यवंशी यांनी नाराजी व्यक्त केली.
दोन वर्षांनंतर मुंबईत होत असलेल्या या राज्यस्तरीय स्पध्रेतील स्थानिक संघटनेकडून दिसायला हवा तितका उत्साह दिसत नव्हता. याबाबत उपनगर व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी सांगितले की, ‘‘आम्हाला कुणी विचारतच नाही. ही स्पर्धा जेव्हा आयोजित करण्याची प्रक्रिया सुरू होती, तेव्हा केवळ एकाच बैठकीला आम्हाला बोलावण्यात आले आणि त्यानंतर कोणताही संपर्क साधण्यात आला नाही. आमच्या सहभागाविषयी विचारत असाल, तर या स्पध्रेला सामनाधिकारी आम्ही दिलेले आहेत. मी आणि सचिव दिनकर देशपांडे येथे हजर आहोत.’’
विशेष म्हणजे उपनगर व्हॉलीबॉल असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य राजेश शानबाग हे राज्य संघटना व क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्याशी संपर्कात होत असल्याचे कळले आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. सदस्यांशी बोलणे होत असेल, तर मग अध्यक्षांना का विचारत घेतले जात नाही, हा प्रश्न थोडा बुचकळ्यात टाकणारा आहे. राज्य संघटना शानबाग यांच्याकडे जबाबदारी सोपवून उपनगर संघटनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.  

सर्व काही आलबेल
क्रीडा व युवक सेवा मुंबई विभागाचे उपसंचालक आनंद व्यंकेश्वर यांना या वादाबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘‘सर्व काही आलबेल आहे. अशा कोणत्याही प्रकारचा वाद येथे दिसत नाही. मी स्वत: उपनगर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधत होतो. त्यामुळे कुणातही नाराजी नाही. येथील स्थानिक कार्यकर्त्यांना स्पर्धा आयोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे आणि ते त्यांचे काम योग्य रीतीने पार पाडत आहेत.’’
मुंबई, कोल्हापुरची विजयी सलामी
छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पध्रेत १८ वर्षांखालील मुलांच्या विभागात मुंबईने नागपूरवर ३-०ने विजय साजरा केला, तर २१ वर्षांखालील विभागात मुंबईने लातूरचे आव्हान ३-० असे सहज परतवले. १८ वर्षांखालील विभागात कोल्हापूरने नाशिकला ३-२ असे नमवले. इतर निकाल : १८ वर्षांखालील मुली – मुंबई वि. वि. लातूर ३-०, कोल्हापूर विजयी वि. औरंगाबाद ३-०, पुणे विजयी वि. नागपूर ३-०; २१ वर्षांखालील मुली – नागपूर विजयी वि. औरंगाबाद ३-०, नाशिक वि. वि. लातूर ३-०, कोल्हापूर विजयी वि. मुंबई ३-१; २१ वर्षांखालील मुले – नागपूर विजयी वि. कोल्हापूर ३-२, अमरावती विजयी वि. पुणे ३-२.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2015 8:12 am

Web Title: state volleyball competition
Next Stories
1 भारतीय पॅराऑलिम्पिक महासंघावर बंदी
2 मॅक्क्युलम न्यूझीलंडच्या प्रगतीचा शिल्पकार
3 युएफा चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा : पीएसजीचा ‘स्वप्नभंग’
Just Now!
X