News Flash

झगडणाऱ्या दिल्लीचा आज बलाढय़ हैदराबादशी सामना

दिल्ली डेअरडेव्हिल्सची यंदाच्या आयपीएलमधील आतापर्यंतची कामगिरी ही रडतखडतच सुरू आहे.

| May 2, 2017 02:14 am

रविवारी किंग्ज इलेव्हन पंजाबने दिल्लीवर दहा विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला.

दिल्ली डेअरडेव्हिल्सची यंदाच्या आयपीएलमधील आतापर्यंतची कामगिरी ही रडतखडतच सुरू आहे. आता दिल्लीच्या बाद फेरीच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. मंगळवारी त्यांच्यासमोर गतविजेत्या सनरायझर्स हैदराबादचे अवघड आव्हान असणार आहे.

रविवारी किंग्ज इलेव्हन पंजाबने दिल्लीवर दहा विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. पंजाबच्या गोलंदाजीपुढे दिल्लीचा संघ ६७ धावांत गारद झाला. आयपीएलच्या क्रिकेट इतिहासातील हा दिल्लीचा नीचांक ठरला. दिल्लीची गोलंदाजी जेमतेम आपला प्रभाव पाडते आहे, मात्र फलदाजांकडून सातत्याने निराशा होत आहे.

आयपीएलच्या आकडेवारीत दिल्लीचा संघ सर्वात तळाला आहे. ८ सामन्यांमध्ये फक्त २ विजयांसह त्यांनी ४ गुण मिळवले आहेत. सनरायझर्स हैदराबादने १० सामन्यांत ६ विजय आणि एका रद्द लढतीमुळे १३ गुण कमावले आहेत. डेव्हिड वॉर्नरचे नेतृत्व आणि त्याची फलंदाजी प्रतिस्पध्र्यासाठी डोकेदुखी ठरत आहे.

यंदाच्या हंगामात सुरुवातीला दिल्लीकडून चांगली उमेद बाळगण्यात येत होती. मात्र दिवसेंदिवस त्यांची कामगिरी अधिकाधिक खराब होत चालली आहे. त्यामुळे आणखी एक झगडणारा आयपीएल हंगाम दिल्लीसाठी ठरत आहे. यात झहीर खानच्या दुखापतीमुळे भर पडली आहे. मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे झहीर पंजाबविरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नव्हता.

दिल्लीचा सलामीवीर इंग्लिश फलंदाज सॅम बिलिंग्ज आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी मायदेशी रवाना होणार आहे. याचप्रमाणे ख्रिस मॉरिस आणि कॅगिसो रबाडा हेसुद्धा येत्या आठवडय़ात आपल्या देशात जाणार आहेत. त्यामुळे दिल्लीची चिंता आणखी वाढू शकेल. प्रेरणादायी नेतृत्वाचा अभाव आणि करुण नायरचा हरवलेला फॉर्म हेसुद्धा दिल्लीच्या अपयशाचे कारण ठरत आहे.

दुसरीकडे हैदराबादचा संघ आयपीएलमध्ये उत्तरोत्तर अधिक ताकदीने अवतरत आहे. वॉर्नर आघाडीवर राहून संघाचे नेतृत्व सांभाळत आहे. ज्या दिवशी दिल्लीचा संघ ६७ धावांवर गारद झाला, त्या दिवशी हैदराबादने ३ बाद २०९ धावा उभारल्या. त्यासुद्धा आयपीएल गुणतालिकेत आघाडीवर असलेल्या आणि सर्वात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्स संघाविरुद्ध या सामन्यात हैदराबादने ४८ धावांनी शानदार विजय मिळवला.

वॉर्नरने ५९ चेंडूंत १० चौकार आणि ८ षटकारांसह १२६ धावांची वादळी खेळी साकारून आपले वर्चस्व दाखवले. सध्याचा ‘ऑरेंज कॅप’धारक न्यूझीलंडचा फलंदाज केन विल्यमसनसुद्धा (४५९ धावा) कमालीचा फॉर्मात आहे. युवराज सिंग धावांसाठी झगडत आहे. त्याला सूर गवसल्यास हैदराबादचा संघ अधिक धोकादायक ठरू शकेल.

भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारसुद्धा टिच्चून गोलंदाजी करीत आहे. सर्वाधिक २० बळींसह ‘पर्पल कॅप’ सध्या त्याच्याकडे आहे. त्याच्या गोलंदाजीतील अचूकता प्रतिस्पर्धी संघांच्या फलंदाजांवर अंकुश ठेवत आहे. अनुभवी गोलंदाज आशीष नेहरा हे हैदराबादचे आणखी एक बलस्थान आहे. मोहम्मद सिराज आपली भूमिका चोख बजावत आहे.काही प्रमुख घटकांमुळे हैदराबादचा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये कोलकाता आणि मुंबई इंडियन्सपेक्षाही भारी वाटत आहे.

सामन्याची वेळ : रात्री ८ वा.

थेट प्रक्षेपण : सोनी ईएसपीएन, सोनी सिक्स.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 1:30 am

Web Title: struggling delhi daredevils take on sunrisers hyderabad
Next Stories
1 बीसीसीआयकडून चेतेश्वर पुजारा, हरमनप्रीत कौरची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस
2 जगविख्यात गिर्यारोहक उली स्टेकचा ‘माऊन्ट एवरेस्ट’ चढताना मृत्यू
3 IPL 2017 Live Score, RPS vs GL : पुण्याचा विजयी ‘स्ट्रोक’, गुजरातवर सनसनाटी विजय
Just Now!
X