करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या देशभर गंभीर वातावरण आहे. केंद्र सरकारने परिस्थितीचा सामना करण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र प्रत्येक दिवशी देशातील महत्वाच्या शहरांमध्ये करानो बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहेत. आतापर्यंत देशभरात १०० पेक्षा जास्त लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. संपूर्ण देशभरात वैद्यकीय यंत्रणा करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. प्रत्येक राज्यात मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सहायता निधीमध्ये लोकं आपापल्या पद्धतीने दान करत आहेत. भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनीही पंतप्रधान आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधीला मिळून ५९ लाखांची मदत केली आहे.

गावसकर यांनी ३५ लाख रुपये पंतप्रधान निधीसाठी तर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २४ लाखांची मदत केली आहे. मुंबईचा माजी खेळाडू अमोल मुझुमदारने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर याची माहिती दिली. याआधी सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा या मुंबईकर खेळाडूंनी करोना विरुद्ध लढ्यात आपला सहभाग नोंदवला आहे. सध्या देशात लॉकडाऊनची परिस्थिती असली तरीही महत्वाच्या शहरांमध्ये करोना बाधित रुग्ण सापडत आहेत.

दरम्यान देशात क्रीडा क्षेत्रालाही करोनाचा फटका बसला आहे. २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा बीसीसीआयने १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. मात्र, ५ एप्रिलनंतर आयपीएल स्पर्धा खेळवली जाईल की नाही याबद्दलही अद्याप शाश्वती नाहीये. मध्यंतरी बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आयपीएल खेळवण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यामुळे आगामी काळात ही परिस्थिती कधी नियंत्रणात येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.