भारताचे माजी कर्णधार सुनिल गावस्कर यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुलला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून परत बोलावून घेण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. वादात सापडलेल्या या दोन्ही खेळांडूंनी इतर खेळाडूंबरोबर ड्रेसिंग रुम शेअर करणे योग्य नव्हते असे मत गावस्कर यांनी व्यक्त केले आहे.

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमामध्ये महिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांवरुन क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुल यांच्यावर टिका होत आहे. या वादामुळे दोघांनाही ऑस्ट्रेलियाला दौऱ्यावरून तडकाफडकी मायदेशात बोलवण्यात आले आहे. बीसीसीआयने दोघांना चौकशीसाठी भारतामध्ये बोलवून घेतले आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर बीसीसीआयने घेतलेल्या या निर्णयाबद्दल बोलताना गावस्कर यांनी हा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे.

‘बीसीसीआयने या संपूर्ण वादावर भूमिका स्पष्ट केली आहे. मी जे काही वृत्तपत्रांमध्ये वाचले आहे त्यावरून त्या दोघांनाही बीसीसीआयने मायदेशी परत बोलवून घेतले आहे. बीसीसीआयची ही कारवाई योग्यच आहे.’ असं मत गावस्कर यांनी व्यक्त केले आहे. ‘जर तुमच्या वागण्यामुळे तुमच्या संघांवर किंवा संघाच्या खेळावर परिणाम होणार असेल तर तुम्ही संघाचा भाग म्हणून राहू शकत नाही. चौकशीनंतर काय कारवाई करायीच याचा निर्णय घेतला जाईल. गरज पडल्यास कारवाई करायलाच हवी.’ अशी भूमिका गावस्कर यांनी मांडली आहे.

बीसीसीआयच्या निर्णयाला पाठिंबा देताना, ‘पांड्या आणि राहुलला भारतात परत येण्यास सांगितले आहे. हे योग्यच आहे. कारण दौऱ्यावर असणारे निलंबित खेळाडू आणि मैदानात खेळणारे खेळाडू एकाच ड्रेसिंग रुममध्ये असणे योग्य नाही. त्यांना वेगळचं ठेवायला हवं. त्यांना जर संघाबरोबरच राहू दिलं असतं तर त्या निलंबनालाही अर्थ राहीला नसता’, असं गावस्कर म्हणाले आहेत

पांड्या आणि राहुल यांना मायदेशी बोलवल्यानंतर त्यांच्या जागी शुभमान गील आणि विजय शंकरन यांना ऑस्ट्रेलियन दौऱ्यामध्ये भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.

दरम्यान पांड्या राहुल प्रकरणाच्या चौकशीसाठी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने सहा जणांच्या एका गटाची स्थापना केली आहे. दोघांवर काय करावाई करावी यासंदर्भातील अहवाल लवकरच या सहा सदस्यीय समितीकडून बीसीसीआयला देण्यात येईल. तपास पूर्ण होईपर्यंत पांड्या आणि राहुल यांना बीसीसीआय, आयसीसी तसेच कोणत्याही राज्यस्तरीय क्रिकेट मंडळाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यावर बंदी घालण्यात आली आहे. अहवालानंतर या दोघांवर काही महिन्यांची बंदी घालण्यात आली तरी त्यांना आयपीएल २०१९ आणि वर्ल्डकप स्पर्धा खेळता येणार नाही. अनेक बडे ब्रॅण्डसने त्यांच्या दोघांबरोबरच करारही रद्द कण्याचा विचार करत आहेत. एकंदरितच त्यांच्या करियरवरच प्रश्न चिन्ह उभे राहत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.