विश्वचषकामधील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावरील बहिष्काराबाबत सुनील गावस्कर यांचे मत

नवी दिल्ली : पाकिस्तानशी क्रिकेट मालिका स्थगित ठेवून भारत त्यांना दुखावत आहे. मात्र आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांवर बहिष्कार घालण्याची भारताची भूमिका धोक्याची ठरू शकेल, असे मत माजी क्रिकेट कर्णधार सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४०हून अधिक जवान शहीद झाले. त्यानंतर भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने पाकिस्तानविरुद्धच्या कोणत्याही क्रिकेट लढतींवर बहिष्कार घालण्याची मागणी केली. त्यानंतर विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील १६ जूनला होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत भारताने न खेळण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

‘‘भारताने विश्वचषकामधील पाकिस्तानविरुद्धची लढत न खेळण्याचा निर्णय घेतल्यास कोण जिंकेल? पाकिस्तान जिंकेल, कारण त्यांना दोन गुण मिळतील. मी उपांत्य किंवा अंतिम सामन्यासंदर्भात बोलतच नाही,’’ असे गावस्कर यांनी सांगितले.

‘‘विश्वचषक स्पर्धेतील आतापर्यंतच्या सर्व सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानला नमवले आहे. त्यामुळे पाकिस्तान हरवून दोन गुण मिळतील, याची खात्री बाळगायला हरकत नाही. त्यामुळे त्यांना आगेकूच करण्यासाठी भारताची भूमिका अनुकूल ठरू नये. जर देशाने पाकिस्तानविरुद्ध सामने न खेळण्याचा निर्णय घेतला, तर त्या भूमिकेशी मी पूर्णत: बांधील असेन. सरकार जो निर्णय घेईल, तो मला मान्य आहे,’’ असे प्रतिपादन गावस्कर यांनी केले.

‘‘पाकिस्तानला केव्हा दुखावले? तर भारताविरुद्ध मालिका न खेळता आल्यामुळे ते आधीच दुखावलेले आहेत. मात्र विश्वचषकासारख्या स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध न खेळणे आव्हानात्मक ठरू शकेल. त्यामुळे हा निर्णय अधिक गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. भावनेच्या भरात हा निर्णय घेणे योग्य नाही,’’ अशी भूमिका गावस्कर यांनी मांडली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील मालिका २०१२ नंतर स्थगित झाल्या आहेत. २००७ मध्ये हे दोन देश अखेरची मालिका खेळले होते.

पाकिस्तानला विश्वचषकातून वगळता येणार नाही!

आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतून पाकिस्तानला वगळण्यात यावे, यासाठी ‘बीसीसीआय’ने ‘आयसीसी’कडे जरूर तक्रार करावी. परंतु तसे घडणे कठीण आहे. कारण अन्य सदस्य राष्ट्रांनीही त्याचा स्वीकार करायला हवा. दुबईत २७ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत होणाऱ्या ‘आयसीसी’च्या परिषदेत याबाबत भूमिका मांडता येऊ शकेल, असे मत गावस्कर यांनी व्यक्त केले.

‘‘भारतात घडलेल्या घटनेबाबत ‘आयसीसी’च्या परिषदेत शोक व्यक्त करण्यापलीकडे फार काही घडणार नाही. ही दोन देशांमधील अंतर्गत बाब आहे, ती त्यांनी परस्पर चर्चेने सोडवावी, असाच सल्ला विश्वातील अन्य देश देतील,’’ असे गावस्कर यांनी यावेळी सांगितले.

इम्रान खान यांना आवाहन

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताविरुद्धचे संबंध सुधारण्यासाठी पहिले पाऊल टाकावे, असे आवाहन गावस्कर यांनी केले आहे. ‘‘इम्रान माझा चांगला मित्र आहे, याशिवाय एक उत्तम क्रिकेटपटू आहे. त्याने जेव्हा देशाची जबाबदारी स्वीकारली, तेव्हा नव्या पाकिस्तानची निर्मिती करणार असल्याचे म्हटले होते. त्याबाबत त्याला मी विचारण्याची वेळ आली आहे,’’ असे गावस्कर यांनी सांगितले.