मध्य प्रदेशला ४७२ धावांची गरज; सूर्यकुमार, आदित्यची शतके
सूर्यकुमार यादव आणि कर्णधार आदित्य तरे यांच्या शतकाच्या बळावर मुंबईने दुसऱ्या डावात ४२६ धावा उभारल्या आणि एकंदर आघाडी ५१६ धावांपर्यंत वाढवली. त्यानंतर चौथ्या दिवसअखेर मध्य प्रदेशची दुसऱ्या डावात २ बाद ९९ अशी बिकट अवस्था झाली आहे. त्यामुळे बुधवारी अखेरच्या दिवशी पराभव टाळून अंतिम फेरी गाठण्यासाठी मध्य प्रदेशला ४७२ धावांची आवश्यकता आहे आणि त्यांचे आठ फलंदाज बाकी आहेत. या पाश्र्वभूमीवर ४० वेळा रणजी विजेतेपदाला गवसणी घालणारा मुंबईचा संघ उपांत्य फेरीच्या सामन्यात विजयाच्या उंबरठय़ावर आहे.
मंगळवारी यादव आणि तरे यांनी सकाळच्या सत्रात आपली शतके झळकावली. या जोडीने चौथ्या विकेटसाठी २१७ धावांची भागीदारी करून संघाला चांगले स्थर्य मिळवून दिले. मात्र शतकानंतर ते फार काळ खेळपट्टीवर टिकाव धरू शकले नाहीत. यादवने २६९ मिनिटे किल्ला लढवून १९९ चेंडूंत २० चौकार आणि एका षटकारासह ११५ धावा केल्या, तर तरेने पाच तास आणि ११९ चेंडूंचा सामना करीत १६ चौकार आणि एका षटकारासह १०९ धावा केल्या. यादव बाद झाल्यानंतर मुंबईचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेले. अभिषेक नायरने जिद्दीने खेळत १२ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ७३ धावा केल्या, मात्र त्याला दुसऱ्या बाजूने योग्य साथ मिळाली नाही. मुंबईचे उर्वरित सात फलंदाज फक्त ११४ धावांत तंबूत परतले. मध्य प्रदेशच्या ईश्वर पांडे आणि हरप्रीत सिंग यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले, तर पुनीत दातेने दोन बळी मिळवले.
मध्य प्रदेशने दुसऱ्या डावाची सावध सुरुवात केली. आदित्य श्रीवास्तव आणि जलाज सक्सेना यांनी ५९ धावांची सलामी नोंदवली. सक्सेना (२५) धावचीत होऊन माघारी परतल्यानंतर रजत पाटीदार (४) फार काळ टिकाव धरू शकला नाही. शार्दूल ठाकूरच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक तरेकडे झेल देऊन तो बाद झाला. श्रीवास्तव ५३ धावांवर खेळत आहे.

संक्षिप्त धावफलक
मुंबई(पहिला डाव) : ३१७
मध्य प्रदेश (पहिला डाव) : २२७
मुंबई (दुसरा डाव) : १२५.१ षटकांत सर्व बाद ४२६ (सूर्यकुमार यादव ११५, आदित्य तरे १०९, अभिषेक नायर नाबाद ७३; हरप्रीत सिंग ३/५५, ईश्वर पांडे ३/१०३)
मध्य प्रदेश (दुसरा डाव) : ३२ षटकांत २ बाद ९९ (आदित्य श्रीवास्तव खेळत आहे ५३, जलाज सक्सेना २५; शार्दूल ठाकूर १/२४)