दिल्लीच्या छात्रसाल स्टेडियमवर मंगळवारी रात्री झालेल्या हाणामारीच्या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून, अनेक कुस्तीपटू जखमी झाले आहेत. या प्रकरणी दोन ऑलिम्पिक पदक विजेत्या सुशील कुमार आणि त्याच्या साथीदारांवर दिल्ली पोलिसांत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आहे.

मॉडेलटाऊन परिसरात मंगळवारी रात्री दोन गटांमध्ये हाणामारी झाली. याआधीसुद्धा अनेकदा या गटांमध्ये चकमकी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र मंगळवारी झालेल्या हाणामारीत एका गटातील इसमाकडून गोळीबारसुद्धा करण्यात आला. त्यामुळे एका कुस्तीपटूला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा त्याची प्रकृती चिंताजनक होती. परंतु काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला असून, या प्रकरणी तपास सुरू आहे. काही अज्ञात व्यक्तींनी स्टेडियममध्ये घुसून धुडगूस घातल्याचा दावा सुशीलने केला आहे. सुशीलने २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य आणि २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावले आहे.

‘‘मृत व्यक्तीचे नाव सागर कुमार असून, तो दिल्ली पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा आहे. आम्ही सुशीलसह साथीदारांवर प्राथमिक माहिती अहवालाद्वारे गुन्हा नोंदवला आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस उपअधीक्षक डॉ. गुरिक्बाल सिंग सिद्धू यांनी सांगितले.

ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. आमच्या कुस्तीपटूंचा या घटनेशी कोणताही संबंध नाही. काही अज्ञात व्यक्ती स्टेडियममध्ये घुसल्या आणि त्यांनी हाणामारी केली, अशी माहिती आम्ही पोलिसांना दिली आहे.

– सुशील कुमार