News Flash

महाराष्ट्राच्या स्वाती गाढवेला सुवर्ण

तिहेरी उडीत राष्ट्रीय विक्रम नावावर असलेल्या मयुखा जॉनीला दुखापत झाली.

| May 1, 2016 03:37 am

महाराष्ट्राची धावपटू स्वाती गाढवेने फेडरेशन चषक राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक अजिंक्यपद स्पध्रेच्या तिसऱ्या व अंतिम दिवशी ३४ मिनिटे ४३.७६ सेकंदाची वेळ नोंदवून १०००० मीटर शर्यतीचे सुवर्णपदक नावावर केले. ओएनजीसीच्या संजीवनी जाधवने (३६:०२.२२) रौप्यपदक, तर दिल्लीच्या मिनूने (३७:०७.३१) कांस्यपदक पटकावले. महाराष्ट्राच्याच मोनिका आथरेला (३९:४०.६९) चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. रिओ ऑलिम्पिकची पात्रता मिळवणाऱ्या टिंटू लुकाने महिलांच्या ८०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले.
राष्ट्रीय विक्रमवीर आणि आशियाई विजेती लुकाने रेल्वेचे प्रतिनिधित्व करताना २ मिनिटे १.८४ सेकंदाची वेळ नोंदवून जेतेपद कायम राखले. तसेच तिने १८ वर्षांपूर्वीचा ज्योतीर्मोयी सिकदार (२ मिनिटे २.२८सेकंद) यांचा स्पर्धा विक्रम मोडला. तामीळनाडूच्या गोमथी मरीमुथूने २:०६.४५ सेकंदासह रौप्य, तर पश्चिम बंगालच्या क्षिप्रा सरकाने २:०६.९५ सेकंदासह कांस्यपदक पटकावले. अंतिम दिवशी एकाही खेळाडूला ऑलिम्पिक पात्रता मिळवता आलेली नाही, तसेच एकही राष्ट्रीय विक्रम झाला नाही.
तिहेरी उडीत राष्ट्रीय विक्रम नावावर असलेल्या मयुखा जॉनीला दुखापत झाली. रिओ ऑलिम्पिकचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून मैदानात उतरलेल्या मयुखाला पहिल्या प्रयत्नात ही दुखापत झाली. उडी मारताना स्वत:वरील नियंत्रण सुटले आणि तिच्या डाव्या घोटय़ाला दुखापत झाली. त्यामुळे तिला वैद्यकीय चाचणीसाठी मैदान सोडावे लागले. प्रशिक्षक ब्रेडोस ब्रेडोसियन यांनी सांगितले की,‘मयुखाला फ्रॅक्चर झालेले नाही, परंतु आम्ही वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याची प्रतीक्षा पाहत आहोत.’
स्पध्रेच्या पहिल्याच दिवशी १०० मीटर शर्यतीत सुवर्णपदकासह राष्ट्रीय विक्रमाची नोंद करणाऱ्या द्युती चंदला अखेरच्या दिवशी २०० मीटरमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ओदिशच्या स्राबनी नंदाने २३.३९ सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्णपदक पटकावले. द्युतीने (२३.४१) रौप्यपदक, तर ज्योथी एचएमने (२३.४२) कांस्यपदक निश्चित केले. याही गटात द्युतीला ऑलिम्पिक पात्रता मिळवण्यात अपयश आले. ऑलिम्पिकवारी साठी २३.२० सेकंदाची विक्रम नोंदवण्याची गरज आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2016 3:37 am

Web Title: swati gadhave
Next Stories
1 सायना पराभूत
2 महाराष्ट्रदिनी महामुकाबला
3 गुजरातचा विजयरथ रोखण्याचे पंजाबसमोर आव्हान
Just Now!
X