भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत सहा जैव-सुरक्षित केंद्रांमध्ये देशांतर्गत क्रिकेट हंगामाचे आयोजन करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा २० डिसेंबरपासून आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा ११ जानेवारीपासून सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.

‘बीसीसीआय’ने राज्य संघटनांना पाठवलेल्या पत्रात चार पर्याय सुचवले आहेत. यापैकी पहिल्या पर्यायान्वये फक्त रणजी करंडक स्पध्रेचे आयोजन करावे, असे म्हटले आहे. फक्त मुश्ताक अली करंडक स्पध्रेचे आयोजन हा दुसरा प्रस्ताव आहे. तिसऱ्या पर्यायात रणजी करंडक आणि मुश्ताक अली करंडक या दोन्ही स्पर्धाच्या आयोजनाचा उल्लेख आहे, तर चौथ्या पर्यायाद्वारे मुश्ताक अली करंडक आणि विजय हजारे करंडक या फक्त मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करता येईल, असे सुचवले आहे.

रणजी करंडक स्पर्धेचे ११ जानेवारी ते १८ मार्च, २०२१ या ६७ दिवसांच्या कालावधीत आयोजन करता येईल, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. मुश्ताक अली स्पध्रेसाठी २० डिसेंबर, २०२० ते १० जानेवारी २०२१ असा २२ दिवसांचा कालावधी लागेल, तर विजय हजारे स्पध्रेसाठी ११ जानेवारी ते ७ फेब्रुवारी, २०२१ अशा २८ दिवसांची आवश्यकता असेल.
‘‘करोना साथीच्या काळात देशांतर्गत क्रिकेटचे वेळळापत्रक तयार करताना अनेक आव्हाने समोर आहेत. खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी आणि शिष्टाचाराचे योग्य पालन करण्यासाठी मोठे वैद्यकीय पथक कार्यान्वित करावे लागेल,’’ असे ‘बीसीसीआय’ने पत्रात म्हटले आहे.

‘बीसीसीआय’चा कृती आराखडा

सहा जैव-सुरक्षित केंद्रांची निर्मिती करावी लागणार आहे. या प्रत्येक केंद्रात तीन मैदानांची व्यवस्था असेल.
३८ संघांपैकी पाच एलिट गटांत आणि एक प्लेट गटात विभाजीत करण्यात येतील. प्रत्येक एलिट गटात सहा संघांचा समावेश असेल, तर प्लेट गटात आठ संघ.

‘बीसीसीआय’चे देशांतर्गत क्रिकेट स्पर्धाचे पर्याय

१. फक्त रणजी करंडक स्पध्रेचे आयोजन.
२. मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० स्पध्रेचे आयोजन.
३. रणजी करंडक आणि मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पध्रेचे आयोजन.
४. मुश्ताक अली ट्वेन्टी-२० आणि विजय हजारे एकदिवसीय स्पध्रेचे आयोजन.