कसोटी क्रिकेटचे महत्व टिकून रहावे म्हणून ICC ने टेस्ट चॅम्पियनशिपचे आयोजन केले आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेटकडे तरूणाई वळणार का? याचं उत्तर लवकरच मिळेल. पण सध्या टी २० सामन्यांचा भडीमार सुरू आहे. केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटच नव्हे तर विविध देशांतर्गत लीगमध्येही टी २० सामन्यांनी कायमचं स्थान मिळवलं आहे. त्यामुळे आता टी २० सामन्यांमध्ये अजून काय नवीन बघायचं राहिलं आहे, असं क्रिकेटप्रेमींना वाटत असेल. पण नुकत्याच झालेल्या टी २० सामन्यांमध्ये काही असं घडलं आहे, जे आतापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यांमध्ये कधीही पाहायला मिळालेलं नव्हतं.

टी २० क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या ८५१ सामन्यात जे घडलं नव्हतं, ते पुढच्या सामन्यांनध्ये तब्बल २ वेळा घडलं आहे. नुकत्याच झालेल्या सामन्यांमध्ये पदार्पणातच टी २० शतक झळकावण्याचा विक्रम २ खेळाडूंनी आपल्या नावे केला. कॅनडाचा रवींदरपाल सिंग आणि नामिबियाचा जेपी कोत्झे यांनी आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये विश्वविक्रमाची नोंद केली. या आधी टी२० मध्ये पदार्पणाच्या सामन्यात कोणालाही शतक करता आलं नव्हतं, पण या दोघांनी नवा इतिहास रचला.

जे पी कोत्झे आणि रवींदरपाल सिंग

 

ICC टी २० वर्ल्ड कप क्वालिफायर क्रिकेट स्पर्धेत या विक्रमाची नोंद झाली. या आधी टी २० मध्ये सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या नावावर होता. पाँटिंगने १४ वर्षांपूर्वी पदार्पणाच्या सामन्यात ९८ धावा केल्या होत्या. तो विक्रम रवींदरपालने मोडला. कॅनडा-कायमन आयलंड आणि नामिबिया-बोत्स्वाना अशा दोन सामन्यात हे विक्रम रचण्यात आले. रवींदरपालने पदार्पणाच्या सामन्यात ४८ चेंडूंत १०१ धावांची खेळी केली. त्यात १० षटकार व ६ चौकारांचा समावेश होता. टी २० क्रिकेटच्या इतिहासात पदार्पणात शतक झळकावण्याचा पहिला मान रवींदरपालने पटकावला.  रवींदरपाल नंतर जेपी कोत्झे याने बुधवारी पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावून या विश्वविक्रमाची बरोबरी साधली. नामिबियाच्या जेपीने ४३ चेंडूंत ९ षटकार व ७ चौकार लगावले आणि नाबाद १०१ धावांची खेळी केली.