टीम इंडिया एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा २०१९ मध्ये उपांत्य फेरीत स्पर्धेतून बाहेर गेली. भारताला न्यूझीलंडने पराभूत केले. या स्पर्धेत भारताने राऊंड रॉबिन फेरीत सुरुवातीला ५ पैकी ४ सामने जिंकून ९ गुण कमावले होते. भारताचा पुढील सामना इंग्लडशी होणार होता. जर त्या सामन्यात इंग्लंड जिंकला असता, तर पाकिस्तानचे उपांत्य फेरीतील स्थान डळमळीत झाले असते. त्यामुळे अशा परिस्थितीत भारतीय संघ पाकच्या संघाला सेमीफायनलापासून वंचित ठेवण्यासाठी काही सामने जाणूनबुजून हरू शकतो, असा आरोप पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बासित अली यांनी केला होता. या वक्तव्याबाबत बासित अली यांनी स्पष्टीकरण देण्याचे आदेश पाकिस्तान क्रिकेट मंडळाने दिल्याचे सांगितले जात आहे.

बासित अली यांनी जे काही वक्तव्य केले ते पाकिस्तान क्रिकेट मंडळाला पटलेले नाही. त्यामुळे बासित अली त्यांनी त्यांच्या त्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण द्यावे. तसेच यापुढे त्यांनी टीव्ही कार्यक्रमात किंवा इतर कुठेही अशा पद्धतीचे वादग्रस्त विधान करणे टाळावे, असे आदेश बासित अली यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

बासित अली यांचे सध्या कार्यरत असलेले प्रशिक्षकपद या विधानामुळे धोक्यात आले आहे. नुकतेच ज्युनिअर निवड समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले होते. तसेच ते कराचीमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या टीमचे अर्धवेळ प्रशिक्षक म्हणूनही काम पाहत होते. पण त्यांच्या या विधानामुळे त्यांची प्रशिक्षकपदाची लांबणीवर टाकण्यात आली आहे. याशिवाय क्रिकेटपटू बासित अली यांना कोचिंग स्टाफमध्ये समाविष्ट करून घेण्यास पाक क्रिकेट बोर्डाने स्पष्ट नकार दिला आहे.

या संर्दभात बोलताना पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी मुंबई मिररला सांगितले की विश्वचषक स्पर्धा सुरु असताना त्यांनी केलेले वक्तव्य आम्हाला पटलेले नव्हते. त्याबाबत आम्ही जाहीर नाराजी व्यक्त केली होती.ते पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे कर्मचारी नाहीत पण तरीदेखील आम्ही आमच्याकडून त्या विधानाबाबत स्पष्टता केली होती.

काय होते प्रकरण –

पाकिस्तानच्या एका कार्यक्रमात बासित अली याला क्रिकेट जाणकार म्हणून बोलवण्यात आले होते. यावेळी सूत्रसंचालकाने त्यांना विचारले की पाकिस्तानचा सेमीफायनलचा मार्ग रोखण्यासाठी भारताचा संघ मुद्दाम सामने पराभूत होईल का? या प्रश्नावर उत्तर देताना बासित अली म्हणाले की पाकिस्तान सेमीफायनलमध्ये जाऊ नये म्हणून भारत मुद्दाम श्रीलंका आणि बांगलादेश यांच्याविरोधात होणार सामना पराभूत होईल. ऑस्ट्रेलियादेखील मुद्दाम भारताविरुद्ध सामना हरला. एवढेच नाही तर १९९२ च्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ जाणूनबुजून पाकिस्तान विरोधात पराभूत झाला होता. कारण त्यांना सेमीफायनलचा सामना त्यांच्या भूमीत खेळायचा होता, असा आरोप बासित अली यांनी केला होता.