आयपीएलच्या बाराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब सामन्यात, केदार जाधवला दुखापत झाली. या दुखापतीमुळे केदार आयपीएलच्या उर्वरित हंगामामधून बाहेर गेला. मात्र ३० मे पासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी संघात केदार जाधवची संघात निवड झाल्याने, भारतीय गोटात चिंतेचं वातावरण पसरलं होतं. केदार जाधव ऐवजी कोणत्या खेळाडूला संघात जागा मिळेल याबद्दल चर्चांनाही उधाण आलं होतं. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, एम.एस.के. प्रसाद यांची निवड समिती केदार जाधवचं विश्वचषक संघातलं स्थान कायम राखणार आहे.

अवश्य वाचा – भारतीय संघ विश्वचषकात उपांत्य फेरीपर्यंत पोहचेल – कपिल देव

ESPNCricinfo या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, केदार जाधवला झालेली दुखापत ही फारशी गंभीर नसल्याची माहिती प्रसाद यांच्या निवड समितीला देण्यात आली आहे. आयसीसीच्या नियमांनुसार प्रत्येक संघ २३ मे पर्यंत आपल्या संघात बदल करु शकतो. त्यामुळे प्रसाद यांच्या निवड समितीने २३ मे पर्यंत थांबण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे केदार जाधवचं विश्वचषक संघातलं स्थान कायम राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अवश्य वाचा – ऑस्ट्रेलियाला धक्का, झाय रिचर्डसन विश्वचषक संघातून बाहेर

टीम इंडियाचे फिजीओ पॅट्रीक फरहात यांनी, केदार संघ इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी बरा होईल अशी माहिती दिली आहे. २२ मे रोजी भारतीय संघ इंग्लंडला रवाना होईल. भारतीय संघाचा पहिला सामना ५ जूनरोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवला जाणार आहे. तोपर्यंत केदार जाधवच्या तब्येतीत सुधारणा होते की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.