दीपक निवास हुडाच्या अष्टपैलू कामगिरीने बुधवारी कबड्डीरसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. दमदार चढाया आणि अचूक पकडी करीत एकीकडे हुडाने बंगाल वॉरियर्सवर दडपण आणले, तर दुसरीकडे राहुल चौधरीने चौफेर चढाया करीत गुणांचा सपाटा लावला. त्यामुळे प्रो कबड्डी लीगमध्ये तेलुगू टायटन्सने बंगालचा ४४-२८ असा पराभव करून गुणतालिकेतील दुसरे स्थान राखले आहे.

गचीबोली इनडोअर स्टेडियमवर घरच्या प्रेक्षकांच्या साक्षीने टायटन्सने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा स्वीकारला आणि सहाव्या मिनिटालाच पहिला लोण चढवला. मग १७व्या मिनिटाला आणखी एक लोण चढवून मध्यंतराला २७-९ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात मात्र बंगालने नेटाने प्रतिकार केला, परंतु  टायटन्सने तितक्याचे त्वेषाने सामना केला .

टायटन्सकडून दीपक हुडाने चढायांचे ५ आणि पकडींचे ६ गुण कमवले. राहुल चौधरीने चढायांचे ९ गुण मिळवले. यात त्याने एका चढाईत तीन गुण मिळवून सर्वाची वाहवा मिळवली. संदीपने पकडीचे ५ गुण मिळवले. बंगालकडून यांग कुन लीने (५ गुण) एकाकी झुंज दिली.  टायटन्सकडून खेळणाऱ्या इराणच्या हादी ओश्तोरॅकला दुखापत झाली. त्यामुळे त्याला पुढच्या काही सामन्यांमध्ये विश्रांती देण्यात येईल. परंतु उपांत्य सामन्यात तो खेळेल, असा आशावाद कर्णधार मेराज शेखने व्यक्त केला. वॉरियर्सचा कर्णधार दिनेश कुमार म्हणाला, ‘‘तीन महत्त्वाचे चढाईपटू आणि एक पकडपटू दुखापतींचा सामना करीत असल्याने आम्हाला युवा खेळाडूंवर अवलंबून राहावे लागत आहे. टायटन्सविरुद्धच्या सामन्यात आक्रमण आणि बचाव या दोन्ही आघाडय़ांवर आमच्या बऱ्याच चुका झाल्या. त्यामुळे पराभव पदरी पडला.’’