News Flash

प्रो कबड्डी लीग : यू मुंबाच्या घोडदौडीला लगाम

चौफेर चढाया व भक्कम पकडी असा अष्टपैलू खेळ करीत तेलुगु टायटन्स संघाने यू मुंबा संघाची विजयी घोडदौड रोखताना ४६-२५ असा विजय मिळवला आणि प्रो कबड्डी

| August 19, 2015 03:29 am

चौफेर चढाया व भक्कम पकडी असा अष्टपैलू खेळ करीत तेलुगु टायटन्स संघाने यू मुंबा संघाची विजयी घोडदौड रोखताना ४६-२५ असा विजय मिळवला आणि प्रो कबड्डी लीगमध्ये खणखणीत विजयाची नोंद केली. दुसऱ्या लढतीत पाटणा पायरेट्सने ३८-२१ अशा फरकाने यजमान पुणेरी पलटणला पराभूत करुन स्पध्रेतील आव्हान कायम राखले आहे.
शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेत तेलुगु टायटन्सविरुद्धच्या सामन्यातही  यू मुंबाने अनुपकुमार, शब्बीर बापू आदी प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली होती. पूर्वार्धात तेलुगु संघाने २०-१२ अशी आघाडी घेतली होती.  तेलुगु संघाने ३० व्या मिनिटाला आणखी एक लोण चढवीत आपली बाजू बळकट केली. त्या वेळी त्यांच्याकडे ३२-१८ अशी आघाडी होती. यू मुंबा संघावर ३९ व्या मिनिटाला तिसरा लोण स्वीकारण्याची नामुष्की आली. या तिसऱ्या लोणसह तेलुगु संघाने हा सामना ४६-२५ असा २१ गुणांनी जिंकला. तेलुगु संघाकडून इसाक अ‍ॅन्थोनी व प्रशांत राय यांनी प्रत्येकी नऊ गुण नोंदविले तर रोहित बालियन याने सात गुण मिळविले.
आजचे सामने
*  पाटणा पायरेट्स वि. जयपूर पिंक पँथर्स
*  पुणेरी पलटण वि. बंगळुरू बुल्स
वेळ : रात्री ७.५० वा. पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स-२ आणि ३, स्टार स्पोर्ट्स एचडी-२ आणि ३, स्टार गोल्ड हिंदी
यजमानांची पराभवाची मालिका सुरूच
* पुणेरी पलटण संघाला आणखी एका पराभवाला सामोरे जावे लागले. पाटणा पायरेट्स संघाने त्यांचा ३८-२१ असा पराभव करीत उपांत्य फेरीच्या आशा कायम राखल्या. पाटणाकडून संदीप नरेवाल व सुरेशकुमार या भारतीय खेळाडूंप्रमाणेच तेक दोंग ओम या परदेशी खेळाडूंनीही संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.
* पुण्याकडून रवीकुमारने पकडीत चांगली कामगिरी केली. त्याने दोन वेळा सुपरटॅकल करीत आठ गुणांची कमाई केली. पाटणा संघास बुधवारी जयपूर पिंकपँथर्स संघाशी खेळावे लागणार आहे. हा सामना या दोन संघांमधील बाद फेरीसाठी महत्त्वाचा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2015 3:29 am

Web Title: telugu titans beats u mumba
Next Stories
1 ‘अ’ संघ कसोटी मालिका : ओमफिले रमेलाचे शतक
2 अ‍ॅशेस मालिकेनंतर रॉजर्स निवृत्त होणार
3 ऑलिम्पिक पदकाची आस -जितू राय
Just Now!
X