सचिन तेंडुलकरची निवृत्ती हा क्रिकेटच्या इतिहासातील सगळ्यात मोठा निवृत्तीचा क्षण असल्याचे उद्गार सुनील गावस्कर यांनी काढले. १९९ वी कसोटी साजरी करण्यासाठी बंगाल क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित कार्यक्रमाने सचिनचे चित्त विचलित होणार नाही, असा विश्वास माजी खेळाडू व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने व्यक्त केला.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेद्वारे सचिनची निवृत्ती ही क्रिकेटविश्वातली सगळ्यात मोठी निवृत्ती असेल का? यावर गावस्कर म्हणाले, ‘माझ्या मते हो असे उत्तर आहे. कुठल्याही निवृत्तीला दु:खाची किनार असते. १८ नोव्हेंबरनंतर सचिन तेंडुलकरला मैदानावर खेळताना पाहता येणार नाही. त्यामुळे या क्षणाभोवती उठलेले मोहोळ अत्यंत स्वाभाविक आहे. सर डॉन ब्रॅडमॅन यांच्यानंतरचा सचिन हा सर्वश्रेष्ठ खेळाडू आहे. त्यामुळे त्याची निवृत्ती ही क्रिकेटविश्वातली सगळ्यात मोठी निवृत्तीची घटना असणार आहे.
सचिनच्या निवृत्तीविषयी उलटसुलट तर्कवितर्क लढवणाऱ्या प्रसारमाध्यमांना गावस्कर यांनी चपराक लगावली. एखादा खेळाडू अधिकृतपणे निवृत्तीविषयी घोषणा करीत नाही तोपर्यंत चर्चा करू नये असे गावस्कर यांनी सांगितले. तेंडुलकर निवृत्त झाल्यानंतर तुम्हाला त्याची सर्वाधिक पोकळी जाणवणार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
हरयाणाविरुद्ध लाहली येथे मुंबईतर्फे सचिनने केलेली खेळी विशेष अशी होती. प्रतिकूल परिस्थितीत साकारलेल्या या खेळीने सचिनचा वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेपूर्वी आत्मविश्वास उंचावलेला असेल. दुसऱ्या डावात त्याने सामना जिंकून देणारी खेळी केली; परंतु यापेक्षाही त्याने खेळपट्टीवर व्यतीत केलेला वेळ महत्त्वाचा होता.
सचिनला मानवंदना देण्यासाठी बंगाल क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम प्रसंगानुरूप आहेत, मात्र यामुळे सचिनचे लक्ष विचलित होणार नाही. कोलकातामध्ये क्रिकेटवेडय़ा प्रेक्षकांची संख्या प्रचंड आहे. या शहरात मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद भारावून टाकणारा असतो.

सचिनसह सचिन
सचिनोत्सव साजरा करणाऱ्या बंगाल क्रिकेट असोसिएशनने सचिनचा एक मेणाचा पुतळा उभारला. भारतीय संघाच्या ड्रेसिंगरुमबाहेर हा पुतळा ठेवण्यात आला आहे.