गोल करण्याच्या अद्भुत क्षमतेसाठी प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा चाहतावर्ग जगभर पसरला आहे. हिंसाचारग्रस्त अफगाणिस्तानमधला एक चिमुरडा मेस्सीचा कट्टर चाहता. परिस्थितीअभावी मेस्सीचे नाव असलेली प्लॅस्टिक जर्सी परिधान करणाऱ्या मुर्तझा अहमदीला खुद्द मेस्सी भेटणार आहे.
पाच वर्षांचा मुर्तझा अहमदीलाही मेस्सीची जर्सी घालून खेळावे अशी इच्छा आहे पण बेतास बेत परिस्थितीमुळे त्याचे कुटुंबीय अहमदीला ही जर्सी विकत घेऊन देऊ शकत नाहीत. मात्र लहान भावाचे मेस्सीप्रेम पाहून अहमदीच्या मोठय़ा भावाने अनोखी शक्कल लढवली. पंधरा वर्षांच्या होमायुनने लहान भावासाठी अर्जेटिनाच्या फुटबॉल संघाच्या गणवेशाप्रमाणे निळा आणि पांढऱ्या पट्टया असलेली प्लॅस्टिकची जर्सी करुन दिली. या जर्सीवर मार्करच्या पेनाने त्याने मेस्सी अशी अक्षरं नोंदवली आणि ही जर्सी लहानग्या अहमदीला सुपुर्द केली. ही अनोखी भेट पाहून अहमदी खुश झाला. अहमदीने ही जर्सी परिधान केली आणि त्याच्या भावाने प्लॅस्टिक जर्सीतील अहमदीचे छायाचित्र समाजमाध्यमांवर टाकले.
मेस्सीप्रेमाने भारलेला आणि प्लॅस्टिक जर्सीतल्या चिमुरडय़ा चाहत्याचे छायाचित्र व्हायरल झाले. खुद्द मेस्सीने या चाहत्याची दखल घेतली. या छोटय़ा चाहत्यासाठी काहीतरी करावे अशी मेस्सीला इच्छा असल्याचे त्याच्या बाबांनी सांगितले. मेस्सी या चाहत्याला भेटण्यासाठी उत्सुक असल्याचे अफगाणिस्तान फुटबॉल महासंघाने सांगितले. मात्र या भेटीसाठी वेळ आणि ठिकाण ठरले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या चाहत्याला भेटण्यासाठी मेस्सी अफगाणिस्तानमध्ये येणार का लहानगा अहमदी मेस्सीला भेटण्यासाठी स्पेनला जाणार हे लवकरच ठरणार आहे. विविध स्पर्धामुळे मेस्सीचे वेळापत्रक व्यस्त आहे. यामुळे एखाद्या तटस्थ ठिकाणीही ही भेट होण्याची शक्यता आहे. ही भेट व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे अफगाणिस्तानमधील स्पेन दूतावासाने स्पष्ट केले. अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचा धोका असल्याने मेस्सीच्या आगमनाची शक्यता धुसर आहे.
अहमदी अफगाणिस्तानातील गझनी प्रांतातील जगहोरी जिल्ह्य़ातील एका शेतकरी कुटुंबाचा भाग आहे. मेस्सीची जर्सी विकत घेण्यासाठी आमच्याकडे पैसा नाही. हवा गेलेला चेंडूसह अहमदी खेळतो. मेस्सीच्या भेटीसाठी दुसऱ्या देशात जाण्याकरता आमच्याकडे पैसा नाही असे त्याच्या वडिलांनी स्पष्ट केले.
किराणा दुकानातील प्लॅस्टिक पिशव्यांपासून तयार झालेली जर्सी परिधान केलेला हा चाहता जगभरातली फुटबॉल चाहत्यांच्या चर्चेचा विषय झाला आहे. तालिबानी अंमल प्रबळ असलेल्या जगहोरी जिल्ह्य़ात फुटबॉट फारसा खेळलाही जात नाही. टीव्हीच्या माध्यमातून अहमदीने फुटबॉल आणि मेस्सीप्रेम जोपासले असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले.