सुनील नरिनची धडाकेबाजी अर्धशतकी खेळी, नितीश राणाची अष्टपैलू कामगिरी आणि दिनेश कार्तिकच्या जबाबदारीपूर्ण फलंदाजीच्या बळावर कोलकाता नाइट रायडर्सने बलाढय़ रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचा चार विकेट आणि ७ चेंडू राखून पराभव केला.
कोलकाताची सुरुवात खराब झाली. ख्रिस लिन (५) लवकर बाद झाल्यानंतर. सलामीवीर सुनील नरिनने जोरदार आक्रमण करताना ४ चौकार आणि ५ षटकारांसह १९ चेंडूंत ५० धावा काढल्या. उमेश यादवने नरिनचा त्रिफळा उडवला. त्यानंतर नितीश राणा (३४) आणि दिनेश कार्तिक (नाबाद ३५) यांनी चौथ्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी रचली.
त्याआधी, बेंगळूरुने ७ बाद १७६ धावांचे आव्हान उभे केले. या धावसंख्येत ब्रेंडन मॅक्क्युलम (२७ चेंडूंत ६ चौकार आणि २ षटकारांसह ४३ धावा) आणि एबी डी’व्हिलियर्स (४४) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. डी’व्हिलियर्सने एक चौकार आणि पाच षटकारांसह फक्त २३ चेंडूंत आपली खेळी साकारली. याशिवाय मनदीप सिंग (१८ चेंडूंत ३७ धावा) आणि कर्णधार विराट कोहली (३१) यांनीसुद्धा योगदान दिले.
डी’व्हिलिर्सच्या आक्रमणामुळे बेंगळूरुचा संघ दोनशे धावांचा टप्पा ओलांडण्याची चिन्हे दिसत होती. मात्र कामचलाऊ ऑफ-स्पिनर नितीश राणाने डी’व्हिलियर्स आणि कोहली हे महत्त्वाचे बळी मिळवत बेंगळूरुच्या धावसंख्येला लगाम घातला. आर. विनय कुमारनेही दोन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु : २० षटकांत ७ बाद १७६ (ब्रेंडन मॅक्क्युलम ४३, एबी डी’व्हिलियर्स ४४; नितीश राणा २/११) पराभूत वि. कोलकाता नाइट रायडर्स : १८.५ षटकांत ६ बाद १७७ (सुनील नरिन ५०, नितीश राणा ३४, दिनेश कार्तिक नाबाद ३५; ख्रिस वोक्स ३/३६)