चाहत्यांच्या अपेक्षांचे प्रचंड ओझे प्रभावीपणे पेलून जेतेपदाच्या प्रबळ दावेदारापणे कामगिरी करणारा इंग्लंड आणि प्रमुख आक्रमणपटू ख्रिस्तियन एरिक्सन प्रसंगातून प्रेरणा घेत स्वप्नवत वाटचाल करणारा डेन्मार्क हे दोन संघ युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. वेम्बले स्टेडियमवर बुधवारी खेळल्या जाणाऱ्या या लढतीत कोणता संघ सुवर्णाध्याय लिहिणार आणि कोणाचा स्वप्नभंग होणार, याकडे तमाम फुटबॉलविश्वाचे लक्ष लागले आहे.

गॅरेथ साऊथगेट यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या इंग्लंडने गटात अग्रस्थान मिळवून दिमाखात बाद फेरी गाठली. त्यानंतर उपउपांत्यपूर्व लढतीत जर्मनी आणि उपांत्यपूर्व सामन्यात युक्रेनचा धुव्वा उडवला. २०१८च्या फिफा विश्वचषकात इंग्लंडला उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले. यंदा मात्र सुरुवातीपासूनच त्यांना चाहत्यांचा उदंड प्रतिसाद लाभत असून घरच्या प्रेक्षकांसमोर खेळून प्रथमच अंतिम फेरीत धडक मारण्याची सुवर्णसंधी त्यांच्याकडे आहे.

दुसरीकडे, कॅस्पर हुलमंड यांच्या डेन्मार्कने गटसाखळीत अवघा एक सामना जिंकून बाद फेरी गाठली. परंतु त्यानंतर आक्रमक खेळाच्या बळावर त्यांनी अनुक्रमे वेल्स, चेक प्रजासत्ताक यांचे आव्हान संपुष्टात आणून अन्य संघांना इशारा दिला. त्यामुळे आता १९९२मध्ये विजेतेपद मिळवल्यानंतर पहिल्यांदाच युरो चषकाच्या अंतिम फेरीत धडक मारण्याचे त्यांना वेध लागले आहेत. त्याशिवाय जगभरातील चाहत्यांचा भावनिक पाठिंबासुद्धा डेन्मार्कला लाभत असल्याने ते कशाप्रकारे मोक्याच्या क्षणी कामगिरी उंचावतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

आक्रमणावर भिस्त

कॅस्पर डोलबर्ग (३ गोल), मिकेल डॅम्सगार्ड (२ गोल) या आक्रमणपटूंनी डेन्मार्कसाठी सातत्याने योगदान दिले आहे. त्याशिवाय थॉमस डेलानी, मार्टिन ब्रेथवेट यांचा अनुभव त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. सुरुवातीपासूनच आक्रमण हीच डेन्मार्कची खरी ताकद असून इंग्लंडच्या बचावफळीला ते भेदू शकतात. मात्र संघातील बहुतांश खेळाडूंना युरो आणि फिफा विश्वचषकासारख्या स्पर्धामध्ये उपांत्य सामना खेळण्याचा अनुभव नसल्याने ही बाब त्यांच्यासाठी धोक्याची ठरू शकते.

बळकट तटबंदी

हॅरी केन (२ गोल), रहीम स्टर्लिग (३ गोल) हे इंग्लंडचे आक्रमणपटू भन्नाट लयीत असून ल्युक शॉ गोलसहाय्य करण्याचे काम चोखपणे करत आहे. त्यामुळे इंग्लंडचा संघ या वेळी अधिक धोकादायक वाटत आहे. गोलरक्षक जॉर्डन पिकफोर्डने इंग्लंडच्या वाटचालीत मोलाची भूमिका बजावली आहे. त्याची तटबंदी भेदणे अद्याप कोणालाही जमलेले नाही. त्याशिवाय इंग्लंडच्या राखीव खेळाडूंमध्येसुद्धा एकापेक्षा एक प्रतिभावान खेळाडू उपलब्ध असल्याने अंतिम संघाची निवड करताना त्यांना डोके खाजवावे लागणार आहे.

’ डेन्मार्क : कॅस्पर शिमॅकल (गोलरक्षक), आंद्रेस ख्रिस्टेन्सन, सिमॉन केर, जॅनिक व्हेस्टगार्ड, स्ट्रीगर लार्सेन, एमिल होजबर्ग, थॉमस डेलानी, जोकिम माहेले, मार्टिन ब्रेथवेट, कॅस्पर डोलबर्ग, मिकेल डॅम्सगार्ड.

’ इंग्लंड : जॉर्डन पिकफोर्ड (गोलरक्षक), कायले वॉकर, ल्युक शॉ, हॅरी मॅग्वायर, जॉन स्टोन्स, डीक्लॅन राइस, कॅल्व्हिन फिलिप्स, मसोन माऊंट,

जेडन सँचो, हॅरी केन, रहीम स्टर्लिग.

१२-४ इंग्लंड आणि डेन्मार्क यांच्यात आतापर्यंत २१ सामने झाले असून इंग्लंडने १२ लढती जिंकल्या आहेत. डेन्मार्कने चार सामन्यांत विजय मिळवला असून उर्वरित पाच लढती बरोबरीत सुटल्या आहेत.

३ युरो आणि फिफा विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धामध्ये उभय संघ तिसऱ्यांदा आमनेसामने येत आहेत. यापूर्वी १९९२ मध्ये बरोबरी, तर २००२ मध्ये झालेल्या लढतीत इंग्लंडने विजय मिळवला होता.

१ इंग्लंडविरुद्ध आतापर्यंत प्रतिस्पर्धी संघाने एकही गोल झळकावलेला नाही. त्याउलट डेन्मार्कने गेल्या तीन लढतींमध्ये सर्वाधिक १० गोल नोंदवले आहेत. त्यामुळे चाहत्यांना कडवी झुंज पाहायला मिळू शकते.

फिनलंडविरुद्धच्या लढतीत एरिक्सनसह झालेली घटना आम्हाला प्रेरणा देणारी ठरली. त्या वेळी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारू, असा विचारही केला नव्हता. आता येथून रिकाम्या हाती माघारी परतणे आम्हाला मुळीच आवडणार नाही.

– कॅस्पर डोलबर्ग, डेन्मार्कचा आक्रमणपटू

डेन्मार्कचा संघ खरंच परिपूर्ण आहे. नेशन्स लीगमध्ये गेल्या वर्षांत त्यांच्याविरुद्ध दोन सामने खेळूनही आम्हाला विजय मिळवता आला नाही. मात्र उपांत्य फेरीत घरच्या चाहत्यांसमोर खेळताना आमची कामगिरी चांगली होईल, याची खात्री आहे.

– हॅरी केन, इंग्लंडचा कर्णधार