दुबईत झालेल्या आशिया चषकात विजय मिळव्यानंतर भारतीय संघाने घरच्या मैदानावर खेळताना विंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत यश मिळवलं. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने यंदा मुंबईच्या पृथ्वी शॉ या तरुण खेळाडुला संधी दिली. पृथ्वीनेही आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवत, पहिल्या कसोटीत शतक तर दुसऱ्या कसोटीत अर्धशतकी खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री पृथ्वीवर चांगलेच खूश आहेत. पृथ्वीमध्ये सचिन-सेहवाग आणि लारा या महान खेळाडूंसारखे गूण असल्याचं प्रशस्तीपत्र रवी शास्त्री यांनी दिलेलं आहे.

“पृथ्वीचा जन्म हा क्रिकेट खेळण्यासाठीच झालेला आहे. वयाच्या आठव्या वर्षापासून तो मुंबईच्या मैदानात क्रिकेट खेळतो आहे. त्याने आतापर्यंत केलेल्या मेहनतीचं फळ त्याला आता मिळतंय. त्याला मैदानात फलंदाजी करताना पाहणं हा एक आनंदाचा क्षण असतो. त्याच्यात मला सचिन-सेहवाग यांच्यातले काही गुण दिसतात. यापुढेही त्याने अशीच मेहनत सुरु ठेवल्यास त्याचं भविष्य उज्वल असेल.” सामना संपल्यानंतर दिलेल्या मुलाखतीमध्ये रवी शास्त्री बोलत होते.

पहिल्या कसोटीतलं शतक व दुसऱ्या कसोटीतलं अर्धशतक या खेळीसाठी पृथ्वीला मालिकावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं. याचवेळी बोलताना रवी शास्त्री यांनी ऋषभ पंत, उमेश यादव यांच्या खेळाचंही कौतुक केलं. सलामीवीर लोकेश राहुल गेल्या काही सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण खेळ करत नाहीये. मात्र प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात असे प्रसंग येतात, राहुल यातून लवकर बाहेर पडेल असा आत्मविश्वास शास्त्री यांनी व्यक्त केला. कसोटी मालिकेनंतर भारत विरुद्ध विंडीज यांच्यात वन-डे आणि टी-20 मालिका रंगणार आहे.