थॉमस आणि उबेर चषकात नारी शक्तीचा प्रत्यय घडवत भारतीय महिला संघाने दिमाखदार विजयाची नोंद केली, पुरुष संघाला मात्र सोमवारी सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. महिला संघाने हाँगकाँगवर ४-१ असा विजय मिळवला, तर कोरियाच्या संघाने भारतीय पुरुष संघाला ३-२ असे नमवले.
महिलांमध्ये सायना नेहवालने पुई यिन यिपचा २१-९, २१-१० असा धुव्वा उडवला. ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा जोडीने होई वाह चाऊ-लोक यान पूनचा जोडीचा २१-१७, २१-१३ असा पराभव केला. पी.व्ही.सिंधूने यिंग मेई चेइंगवर २१-८, २१-१० असा विजय मिळवला. त्स्झ का चान-यिंग स्युएट त्से जोडीने सिक्की रेड्डी-प्रज्ञा गद्रे जोडीवर २१-१४, २१-११ अशी मात केली. शेवटच्या लढतीत पी.सी. तुलसीने ह्य़ुंग युंग चानला १९-२१, २१-१६, २१-७ असे नमवले.
पुरुष गटात भारताला विजयासाठी सर्व एकेरीचे सामने जिंकण्याची नितांत आवश्यकता होती. कर्णधार पारुपल्ली कश्यप आणि आरएमव्ही गुरूसाइदत्त यांनी दमदार कामगिरी करून विजय मिळवले, परंतु किदम्बी श्रीकांत पहिल्याच एकेरी लढतीत अपयशी ठरला. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या वान हू सूनने एक तास ११ मिनिटे रंगलेल्या लढतीत श्रीकांतला १७-२१, २१-१२, २१-१८ असे पराभूत केले. कश्यपने ली डाँग कियुनचा २१-१७, २१-१४ असा पराभव केला, तर गुरुसाईदत्तने वांग जाँग सूचा २४-२२, २१-१३ असा पराभव केला.
दुहेरीच्या लढतीत यिऑन सीआँग यू आणि याँग दाई ली यांनी बी समीथ रेड्डी आणि मनू अत्री जोडीला २१-१८, २१-१७ असे सहज नमवले. याचप्रमाणे जागतिक क्रमवारीतील चौथ्या स्थानावरील किम सा रँग आणि किम कि जंग जोडीने अक्षय देवलकर आणि प्रणव चोप्राला २१-१६, २१-१६ असे नमवले.