आयपीएल आणि स्थानिक क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करुनही ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघात स्थान न मिळालेल्या सूर्यकुमार यादवला सध्या सोशल मीडियावर सर्वत्र पाठींबा मिळतो आहे. अनेक क्रिकेटप्रेमींनी सूर्यकुमारला भारतीय संघात स्थान न दिल्यामुळे बीसीसीआय आणि निवड समितीवर टीकेची झोड उठवली होती. परंतू भारतीय संघाचे माजी खेळाडू व निवड समिती सदस्य यांनी सूर्यकुमारची बाजू घेऊन टीका करणाऱ्यांनी कोणत्या खेळाडूला संघाबाहेर काढायचं याचंही उत्तर द्यावं असं म्हणत…निवड समितीच्या निर्णयाला पाठींबा दिला आहे.

“सूर्यकुमार यादवची बाजू घेऊन निवड समितीवर टीका करणाऱ्या सर्व तज्ज्ञ मंडळींना माझं आवाहन आहे की कोणत्या खेळाडूला संघाबाहेर काढून सूर्यकुमारला जागा द्यावी हे देखील त्यांनी सांगावं. भारतीय संघाची सध्याची राखीव फळीही तितकीच तगडी आहे. त्यामुळे संघ निवडताना…निवड समितीसमोर वगळायचं कोणाला हाच प्रश्न मोठा असतो. एका जागेसाठी चार खेळाडू शर्यतीत असतील तर काहींना थांबावच लागेल. सूर्यकुमार उत्तम खेळाडू आहे, पण त्याला थोडा संयम दाखवावा लागेल. त्याने चांगला खेळ करत धावा करत राहण्याकडे लक्ष द्यावं. मयांक अग्रवाललाही अशाच पद्धतीने संघात स्थान मिळालं होतं आणि आज तो चांगली कामगिरी करतोय.” टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत देवांग गांधी यांनी आपलं मत मांडलं.

अनेकदा संघनिवड करताना निवड समिती सदस्य आणि कर्णधार विराट कोहलीमध्ये मतभेद झाल्याचंही देवांग गांधी यांनी सांगितलं. मात्र चर्चा केल्यानंतर हे सर्व मतभेद विसरुन एकमताने निर्णय होतो. अनेकदा विराटने आम्हाला विचारलं आहे की या खेळाडूमध्ये तुम्हाला असं काय दिसलं?? त्यावेळी त्या खेळाडूची संघाला का गरज आहे हे देखील आम्ही त्याला समजावून सांगायचो, असं गांधी म्हणाले.