भारतीय महिला हॉकी संघाने उपांत्य फेरी गाठत टोक्यो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. पण त्यांचा प्रवास अर्जेंटिनाने रोखला. अटीतटीच्या झालेल्या लढतीत अर्जेंटिनाने भारताला २-१ असे पराभूत करत फायनलमध्ये धडक दिली. अर्जेंटिनाची कर्णधार मारिओ नोएल बारिनोवोने दोन गोल करत संघाच्या विजयाचा पाया रचला. तर भारताकडून  ड्रॅग-फ्लिकर गुरजीत कौरने गोल केला. भारताच्या १८ सदस्यीय महिला संघाने सोमवारी तीन वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा १-० असा पराभव करत प्रथमच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.

Live Blog

17:09 (IST)04 Aug 2021
भारत पराभूत, आता लढत कांस्यपदकाची

अटीतटीच्या सेमीफायनलमध्ये अर्जेंटिनाने भारताला २-१ असे पराभूत करत अंतिम फेरीत धडक दिली आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या भारताच्या महिला हॉकी संघाला आता कांस्यपदकाच्या लढतीसाठी ग्रेट ब्रिटनशी झुंजावे लागेल.

16:54 (IST)04 Aug 2021
भारताला पेनल्टी कॉर्नर

चौथ्या क्वार्टरमध्ये भारताला १० मिनिटे शिल्लक असताना पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण त्यांना गोल करता आला नाही. भारतीय संघ शेवटच्या काही मिनिटांत अर्जेंटिनाशी बरोबरी साधण्याचा जोरदार प्रयत्न करत आहे. 

16:46 (IST)04 Aug 2021
तिसऱ्या क्वार्टरचा खेळ समाप्त

तिसऱ्या क्वार्टरमध्ये पिछाडीर पडलेल्या भारताने शेवटपर्यंत बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला, पण अर्जेंटिनाच्या बचावपटूंनी त्यांला २३ मीटरच्या आत पोहोचू दिले नाही.

16:34 (IST)04 Aug 2021
अर्जेंटिनाचा दुसरा गोल

दुसऱ्या सत्रात अर्जेंटिनाची कर्णधार मारिओ नोएल बारिनोवोने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करत २-१ अशी आघाडी घेतली. 36' Penalty Corner for Argentina.Noel Barrionuevo scores her second goal of the game and puts 🇦🇷 into the lead.🇦🇷 2:1 🇮🇳#ARGvIND #HaiTayyar #IndiaKaGame #Tokyo2020 #TeamIndia #TokyoTogether #StrongerTogether #HockeyInvites #WeAreTeamIndia #Hockey— Hockey India (@TheHockeyIndia) August 4, 2021

16:24 (IST)04 Aug 2021
सामन्याला सुरुवात

उपांत्य सामन्याच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आहे. 

16:13 (IST)04 Aug 2021
दुसरे क्वार्टर समाप्त

दुसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी १-१ अशी बरोबरी राखली आहे.

16:11 (IST)04 Aug 2021
अर्जेंटिनाला पेनल्टी कॉर्नर

दुसऱ्या क्वार्टरच्या समाप्तीला ३ मिनिटे शिल्लक असताना अर्जेंटिनाला  पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र त्यांना गोलमध्ये रुपांतर करता आले नाही. 

16:06 (IST)04 Aug 2021
भारताला सलग तीन पेनल्टी कॉर्नर, पण...

दुसऱ्या क्वार्टरच्या समाप्तीला ५ मिनिटे शिल्लक असताना भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र त्यांना गोलमध्ये रुपांतर करता आले नाही. त्यानंतर भारताला अजून दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. तिसऱ्या पेनल्टी कॉर्नरचा पंचानी आढावा घेतला. त्यामुळे तो कॉर्नर देता आला नाही.

15:57 (IST)04 Aug 2021
अर्जेंटिनाची बरोबरी

दुसऱ्या क्वार्टरमध्ये अर्जेंटिनाच्या कर्णधाराने गोल करत भारताशी बरोबरी साधली. ३७ वर्षीय मारिओ नोएल बारिनोवोने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर केले.

15:52 (IST)04 Aug 2021
दुसऱ्या क्वार्टरला सुरुवात

पहिल्या क्वार्टरमध्ये भारताने आघाडी घेतल्यानंतर अर्जेंटिनाने दुसऱ्या क्वार्टरमध्ये आक्रमणाला सुरुवात केली आहे. 

15:42 (IST)04 Aug 2021
भारताचा भक्कम बचाव

सातव्या मिनिटाला अर्जेंटिनाला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण भारताकडून सुशीला चानूने बचाव करत अर्जेंटिनाला बरोबरी करू दिली नाही.

15:37 (IST)04 Aug 2021
दुसऱ्याच मिनिटाला गोल

उपांत्य सामना सुरू होताच दुसऱ्या मिनिटाला भारताने पहिला गोल केला. अर्जेटिंनाच्या चुकीमुळे भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, त्यानंतर या संधीचे भारताने गोलमध्ये रुपांतर केले. ड्रॅग-फ्लिकर गुरजीत कौरने पुन्हा एकदा आपले कौशल्य दाखवत हा गोल केला. 

15:37 (IST)04 Aug 2021
अर्जेंटिनाची कामगिरी

अर्जेंटिना महिला संघाने सिडनी आणि लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदके जिंकली पण त्यांना अद्याप सुवर्णपदक मिळवता आलेले नाही. २०१२ नंतर त्यांनी प्रथमच उपांत्य फेरी गाठली आहे. २०१६च्या ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या जर्मनीला अर्जेंटिनाने उपांत्यपूर्व फेरीत ३-०ने पराभूत केले. भारतीय संघाने मात्र सलग तीन पराभवांनंतर सलग तीन विजय नोंदवले आणि आत्मविश्वासाने भरलेला आहे. या दोन संघांमधील अलीकडील रेकॉर्ड बघितले, तर अर्जेंटिनाचा वरचष्मा असल्याचे दिसते. भारतीय महिलांनी यावर्षी ऑलिम्पिकपूर्वी अर्जेंटिनाचा दौरा केला होता. भारताने तेथे सात सामने खेळले. यापैकी अर्जेंटिनाच्या युवा संघाविरुद्ध त्याने दोन्ही सामने २-२ आणि १-१ असे बरोबरीत सोडवले. त्यानंतर भारत अर्जेंटिनाच्या ब संघाशी खेळला ज्यामध्ये त्यांना १-२ आणि २-३ने पराभव पत्करावा लागला. अर्जेंटिनाच्या वरिष्ठ संघाविरुद्ध, त्यांनी पहिला सामना १-१ बरोबरीत सोडवला, परंतु पुढील दोन सामने ०-२ आणि २-३ने गमावले.

15:36 (IST)04 Aug 2021
भारताची कामगिरी

आजच्या उपांत्य फेरीत राणी रामपालच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय शिलेदारांसमोर अर्जेंटिनाचे कडवे आव्हान आहे. मॉस्को येथे १९८० मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत महिला हॉकीचा प्रथमच समावेश करण्यात आला. त्या वेळी भारताने सहा संघांपैकी चौथे स्थान प्राप्त केले होते. यंदा मात्र एकंदर तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय महिलांनी एक पाऊल पुढे टाकले. त्यांना २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये १२व्या स्थानी समाधान मानावे लागले होते. १९८० नंतरची ही भारतीय महिला संघाची सर्वोत्तम कामगिरी आहे.

15:36 (IST)04 Aug 2021
भारत-अर्जेंटिना हॉकी सामन्याला सुरुवात

भारतीय महिला हॉकी संघाने उपांत्य फेरी गाठत टोक्यो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. आता हा संघ उपांत्य फेरीत अर्जेंटिनाचा पराभव करून फायनल गाठण्याच्या हेतूने मैदानात उतरली आहे. भारताच्या १८ सदस्यीय महिला संघाने सोमवारी तीन वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा १-० असा पराभव करत प्रथमच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. ड्रॅग-फ्लिकर गुरजीत कौरने २२व्या मिनिटाला भारताचा एकमेव गोल केला, जो शेवटी निर्णायक ठरला. अर्जेटिंनाविरुद्धच्या उपांत्य सामन्याला सुरुवात झाली आहे.