भारतीय संघावर मात करत बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेत १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. बांगलादेशच्या संघाचं हे पहिलंच विजेतेपद ठरलं. मात्र या विजयाला सामन्यानंतर झालेल्या वादामुळे गालबोट लागलं. सामन्यात बाजी मारल्यानंतर बांगलादेशच्या सर्व खेळाडूंनी मैदानात येऊन जल्लोषाला सुरुवात केली. यादरम्यान बांगलादेशच्या संघातील एका राखीव खेळाडूने भारतीय खेळाडूकडे पाहत काही आक्षेपार्ह वक्तव्य केलं…यावर भारतीय खेळाडूंनीही बांगलादेशी खेळाडूला प्रत्युत्तर दिलं. ज्यामुळे काहीकाळ मैदानात दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जुंपलेली पहायला मिळाली. मात्र पंचांनी वेळेतच यामध्ये हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

भारतीय कर्णधार प्रियम गर्गने या प्रकारासाठी बांगलादेशला दोषी ठरवलं आहे. “आम्ही शांत होतो. हार-जीत हा खेळाचा एक भाग आहे, कधीतरी तुम्ही जिंकता तर कधीतरी तुम्ही हरता…मात्र बांगलादेशी खेळाडूंचं सेलिब्रेशन किळसवाणं होतं. हा प्रकार व्हायला नको होता, पण आता सगळं ठीक आहे.” Espncricinfo संकेतस्थळाशी प्रियम बोलत होता. सामन्यादरम्यानही बांगलादेशी खेळाडू आक्रमक पहायला मिळत होते.

अवश्य वाचा – Video : संघाच्या विजयाला बांगलादेशी खेळाडूंनी लावलं गालबोट, भर मैदानात हमरीतुमरी

दरम्यान बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीने सामन्यानंतर या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. “मैदानात जे काही घडलं ते दुर्दैवी होतं…नेमकं काय झालं हे मला माहिती नाही. पण अंतिम सामन्यात खेळाडू भावनेच्या भरात असं कृत्य करुन बसतात. क्रिकेटमध्ये असे प्रकार घडायला नकोत, खेळाप्रती सर्वांना आदर असायलाच हवा. क्रिकेट हा सभ्य माणसांचा खेळ म्हणून ओळखला जातो. कर्णधार या नात्याने मी संघाकडून माफी मागतो.” यावेळी अकबर अलीने भारतीय संघाने अंतिम सामन्यात दिलेल्या झुंजीचंही कौतुक केलं.