२०२० या नवीन वर्षात भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील सामन्याचा थरार मंगळवारी अनुभवायला मिळणार आहे. दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत भारतीय संघासमोर पाकिस्तानचं आव्हान असणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत अफगाणिस्तानवर मात करत पाकिस्तानने उपांत्य फेरीत आपलं स्थान पक्क केलं. भारताविरुद्द सामन्याआधी पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद हुरायराने मोठं विधान केलं आहे.

“भारत आणि पाकिस्तान या दोन संघांमधलं द्वंद्व कायम राहणार आहे. भारताविरुद्ध खेळत असताना प्रत्येकावर थोडा अधिकचा दबाव असतो, पण आम्हाला याची सवय झालेली आहे. माझ्यापुरतं बोलायला गेलं तर मी या सामन्याकडे इतर सामन्य सामन्यांसारखंच पाहतो.” प्रसारमाध्यमांशी बोलत असताना मोहम्मदने आपली प्रतिक्रीया दिली.

भारतीय संघ १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेचा गतविजेता आहे. पाकिस्तानने २००४ आणि २००६ साली सलग या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. २००६ साली पाकिस्तानी गोलंदाजांनी थरारक मारा करत भारताला ७१ धावांत गारद केलं होतं. पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या मागील विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर मात केली होती, त्यामुळे मंगळवारच्या सामन्यात प्रियम गर्गचा भारतीय संघ हा करिष्मा पुन्हा घडवून आणतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.