यूरो कप २०२० स्पर्धेत ‘फ’ गटात खेळल्या गेलेल्या सामन्यात फ्रान्सने हंगेरीविरुद्ध १-१ अशी बरोबरी पत्करली आहे. पुस्कास एरेना येथे रंगलेल्या सामन्यात हंगेरीने पहिल्या सत्रात बलाढ्य फ्रान्सला धक्का देत १-० अशी आघाडी घेतली होती, पण फ्रान्सचा स्टार खेळाडू अँटोनियो ग्रिझमनने दुसऱ्या सत्रात गोल करत बरोबरी साधली. फ्रान्सने गटात चार गुणांसह अव्वल स्थानी झेप घेतली आहे. तर हंगरी तिसऱ्या स्थानी आहे.

पहिले सत्र

६०,००० प्रेक्षकांची उपस्थित असलेल्या सामन्यात चौथ्या मिनिटाला हंगेरीला फ्री किक मिळाली, पण ही किक त्यांच्यासाठी फलदायी ठरली नाही. १४व्या मिनिटाला हंगेरीचा गोलकीपर गुलास्कीने दमदार बचाव करत फ्रान्सला गोल करू दिला नाही. पहिल्या सत्रातील अतिरिक्त दोन मिनिटात हंगेरीने गोल करत फ्रान्सला धक्का दिला. अतिल्ला फिओलाने हंगेरीसाठी गोल केला. फिओलाचा हा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील दुसरा गोल ठरला.

 

दुसरे सत्र

वर्ल्ड चॅम्पियन फ्रान्स पिछाडीवर पडल्यानंतर दुसऱ्या सत्रात त्यांनी आक्रमक खेळायला सुरुवात केली. ५२व्या मिनिटाला हंगेरीच्या बोटकाला एम्बाप्पेला पाडल्यामुळे पिवळे कार्ड मिळाले. ५७व्या मिनिटाला फ्रान्सने रॅबिओटला बाहेर बोलवत डेंबेलला संधी दिली. मैदानात येताच डेंबेलेने गोल करण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला. ६६व्या मिनिटाला फ्रान्सचा सुपरस्टार खेळाडू अँटोनियो ग्रीझमनने गोल करत हंगेरीशी बरोबरी साधली. ७६व्या मिनिटाला फ्रान्सने पोग्बा आणि बेंझेमाला बाहेर नेत दोन नवे खेळाडू मैदानात आणले. ८२व्या मिनिटाला फ्रान्सच्या एम्बाप्पेला गोल करण्याची संधी होती, पण हंगेरी गोलकीपरने तो गोल वाचवला. ९० मिनिटांचा खेळ संपल्यानंतर अतिरिक्त ४ मिनिटे देण्यात आली, पण एकाही संघाला आघाडी घेता आली नाही.