आयपीएलच्या या सत्रात खेळाडू आणि पंचांमध्ये अनेकदा वाद झाल्याचं पहायला मिळालं आहे. ताजं प्रकरण इंग्लिश अंपायर नीजल लॉन्ग यांच्याशी संबंधित आहे. एम चिन्नास्वामी स्टेडिअममधील सामन्यादरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत नीजल लॉन्ग यांचा वाद झाला होता. या वादानंतर नीजल लॉन्ग इतके संतापले होते की, हैदराबादचा डाव संपल्यानंतर अंपायर रुममध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी जोरात दरवाजावर लाथ घालून आपला संताप व्यक्त केला. नीजल लॉन्ग यांनी इतक्या जोरात लाथ मारली की दरवाजा तुटला.

शनिवारी रॉयल चॅलेंजर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल सत्रातील लीग राऊंडमधील आपला शेवटचा सामना खेळला गेला. यावेळी अंपायर नीजल लॉन्ग यांनी आरसीबीचा गोलंदाज उमेश यादवच्या एका चेंडूला नो बॉल दिला. पण जेव्हा रिप्ले पाहण्यात आला तेव्हा अनुभवी नीजल लॉन्ग यांच्याकडून चूक झाल्याचं स्पष्ट झालं. उमेश यादवचा पाय रेषेच्या मागे पडला असल्याचं स्पष्ट दिसत होतं.

नियमाप्रमाणे हा नो बॉल नव्हता यामुळे गोलंदाज उमेश यादवने आणि विराट कोहली नाराज झाले जे साहजिक होतं. मैदानातील स्क्रीनवर रिप्ले पाहिल्यानंतर उमेश यादव आणि विराट कोहली यांनी नीजल लॉन्ग यांच्या चुकीच्या निर्णयाचा विरोध केला. मात्र अंपायर नीजल लॉन्ग यांनी आपला निर्णय मागे घेतला नाही.

कर्नाटक क्रिकेट असोसिएशनकडे CoA करणार तक्रार
प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, जेव्हा सनरायजर्स हैदराबादचा डाव संपला लॉन्ग आपल्या सहकारी अंपायरसोबत पॅव्हेलियनमध्ये पोहचले आणि रागात अंपायर रुमच्या दरवाजावर लाथ मारली. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने सामनाधिकारी नारायम कुट्टी यांना या प्रकरणाची माहिती दिली आहे.

नंतर लॉन्ग यांनी कर्नाटक क्रिकेट असोसिएशनसोबत चर्चा करत पाच हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून दिले. आयपीएलचे सीओओ हेमंग अमीन यांनी आपल्याला याप्रकरणी पूर्ण माहिती मिळाली नसून, लवकरच यासंबंधी माहिती घेऊ असं सांगितलं आहे. दरम्यान कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीसमोर प्रकरण मांडण्याचा निर्णय घेतला आहे.