मुलूखमैदान

सिद्धार्थ खांडेकर

मॅक्सवेल, पुकोवस्की, मॅडिन्सन, हेन्रिकेस यांच्यासारखे किती ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डळमळत्या मानसिक अवस्थेतूनही खेळत आहेत, असा प्रश्न ऑस्ट्रेलियन क्रिकेट व्यवस्थेला सध्या सतावत आहे. विख्यात माजी कर्णधार आणि समालोचक इयन चॅपेल यांनी या घडामोडीचे वर्णन साथीचा विकार अशा समर्पक शब्दांत केले आहे.

सामने जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाचे आणि त्यातही प्रतिस्पर्धी संघातील महत्त्वाच्या क्रिकेटपटूचे किंवा कर्णधाराचे मानसिक खच्चीकरण (मेंटल डिसइंटिग्रेशन) करण्याचे डावपेच विख्यात कर्णधार स्टीव्ह वॉने तत्कालीन दिग्विजयी ऑस्ट्रेलियन संघाच्या अंगवळणी पाडले होते. ऑस्ट्रेलियन क्रिकेट किंवा एकंदरीतच ऑस्ट्रेलियन क्रीडा संस्कृतीमध्ये शारीरिक तंदुरुस्तीइतकेच मानसिक कणखरपणाला महत्त्व दिले जाते. यातूनच विशेषत क्रिकेटमध्ये एकीकडे ‘बॉडीलाइन’सारख्या भयंकर डावपेचाला डॉन ब्रॅडमन आणि त्यांचे सहकारी मोठय़ा हिकमतीने सामोरे गेले, तर दुसरीकडे प्रतिस्पर्धी फलंदाजाला गोलंदाजाकडून आणि मैदानावरील क्षेत्ररक्षकांकडून (स्लेजिंग) शिवीगाळ करण्याची संस्कृतीही बोकाळली. ‘प्ले हार्ड, पार्टी हार्डर’ या न्यायानुसार दिवसभर एखाद्या खेळाडूची टिंगलटवाळी केल्यानंतर सायंकाळी त्याच खेळाडूबरोबर बियर किंवा इतर मद्य घेत गप्पा मारण्याची दिलदारीही अनेक ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंकडे होती. अलीकडच्या काळात चांगल्या प्रतिस्पर्धी खेळाडूला इतर मार्गानीही ‘टार्गेट’ केले जाते. अमक्याचे तंत्र मी उघडे पाडणार किंवा तमका एखादा १००हून अधिक धावा संपूर्ण मालिकेत कसा करून दाखवतो ते पाहायला मजा येईल, वगैरे विधाने प्रसिद्धीमाध्यमांमध्ये पेरून वेगळ्या मार्गानेही ‘मेंटल डिसइंटिग्रेशन’ मोहीम राबवली जायची. ही सगळी जंत्री मांडण्याचे कारण म्हणजे आता त्याच ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये एक नव्हे, दोन नव्हे तर तीन क्रिकेटपटूंनी मानसिक कारणांस्तव क्रिकेटपासून काही दिवस दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे तसा निर्णय त्यांना घ्यावा लागला. या निर्णयाच्या मुळाशी चिंता, नैराश्य, भयगंड, भीती, अनिश्चितता, अनिच्छा अशा अनेक भावनाछटा आहेत. ग्लेन मॅक्सवेल, विल पुकोवस्की आणि निक मॅडिन्सन या तीन क्रिकेटपटूंनी एकाच हंगामात या प्रकारच्या समस्येची वाच्यता केल्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये खळबळ उडणे स्वाभाविक आहे. विख्यात माजी कर्णधार आणि समालोचक इयन चॅपेल यांनी या घडामोडीचे वर्णन साथीचा विकार अशा समर्पक शब्दांत केले आहे. लवकरच उपाय योजले नाहीत, तर हा विकार सर्वत्र पसरेल, असा इशारा ते देतात. मॅक्सवेल हा क्रिकेटपटू आपल्यासाठी पुरेसा परिचित आहे. विध्वंसक फलंदाज, उपयुक्त फिरकी गोलंदाज आणि टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये कोणत्याही कर्णधाराला आपल्या संघात असावा असा वाटेल अशा योग्यतेचा अष्टपैलू क्रिकेटपटू. इंग्लंडमध्ये काही महिन्यांपूर्वी संपलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत मॅक्सवेलकडून मोठय़ा अपेक्षा होत्या. परंतु मॅक्सवेल त्या पूर्ण करू शकला नाही. किंबहुना, तो आणि आणखी एक अष्टपैलू क्रिकेटपटू मार्क्‍स स्टॉयनिस यांचे अपयश हा ऑस्ट्रेलियाच्या यथातथा कामगिरीमागील एक महत्त्वाचा घटक होता. पण केवळ तेवढय़ावरून मॅक्सवेलला कोणी संघाबाहेर काढणार नव्हते. मग अनिश्चित काळासाठी संघाबाहेर राहण्याचा निर्णय त्याने का घेतला असावा? क्रिकेटचा किंवा आधुनिक व्यावसायिक क्रिकेटशी निगडित दिनचर्येचा त्याला विलक्षण तिटकारा आला असावा, असा एक अंदाज व्यक्त केला जातो. खेळातून आनंद मिळतो म्हणूनच आपण खेळाकडे वळतो ना? पण खेळातून हा आनंदच हिरावला जाणार असेल, तर तो खेळ कसा राहणार? काही वेळा अपयशातून उद्भवणाऱ्या हुरहुरीमुळे हा आनंद मावळू लागतो. काही वेळा सतत चांगले खेळूनही परत नवीन दिवशी पुन्हा तस्सेच चांगले खेळण्याच्या दडपणामुळे हा आनंद विरू लागतो. मॅक्सवेलच्या बाबतीत तो ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये स्थिरावलेला होता. तर पुकोवस्की आणि मॅडिन्सन हे ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघात स्थिरावू शकत होते. ते स्थिरावू इच्छित होते का, हा या संदर्भातील महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तूर्त त्याचे उत्तर ‘नाही’ असेच द्यावे लागते. आणखी एक ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मॉयसेस हेन्रिकेसलाही या समस्येने ग्रासले होते. या चारही क्रिकेटपटूंनी समस्येची वाच्यता करण्याचे धाडस दाखवल्याबद्दल त्यांचे कौतुक होते आहे. असे कौतुक करण्यात विराट कोहली आघाडीवर होता. मॅक्सवेलची तारीफ करताना विराटने स्वानुभवाचा दाखला दिला. २०१४मध्ये इंग्लंड दौऱ्यात अपयशी ठरताना आपल्यालाही नैराश्य आणि अनिच्छेने घेरले होते, अशी कबुली विराटने यानिमित्ताने पहिल्यांदाच दिलेली आहे.

मॅक्सवेल, पुकोवस्की, मॅडिन्सन, हेन्रिकेस यांच्यासारखे किती ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डळमळत्या मानसिक अवस्थेतूनही खेळत आहेत, असा प्रश्न ऑस्ट्रेलियन क्रिकेट व्यवस्थेला सध्या सतावत आहे. या तिघा-चौघांनी किमान तसे धाडस दाखवले. याचा अर्थ क्रिकेटपासून काही काळ दूर राहणे. याचा अर्थ सावरल्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये स्थिरावण्यासाठी पुन्हा नवा संघर्ष, पुन्हा नवी आव्हाने, यशापयशाचा अनादि-अनंत फेरा. इतके सगळे होऊनही ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करण्याची शाश्वती नाहीच. त्याही पुढे जाऊन, बिग बॅश लीगचे काय? आयपीएलमध्ये संधी मिळेल का? क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे ‘सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट’मध्ये स्थान आणि त्यातून शाश्वत मानधन वर्षांकाठी तरी मिळणार का? ऑस्ट्रेलियाच्या इतरही क्रिकेटपटूंना मानसिक समस्या असतील, पण त्यांची वाच्यता करून खेळाबाहेर राहण्याची आपली तयारी नाही या वास्तवाच्या जाणिवेने ते आणखी हताश होत असतील. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबाबत एक धोरण निश्चित केले आहे. भविष्यातील परदेश दौऱ्यांसाठी प्रत्येक क्रिकेटपटूच्या शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच त्याची किंवा तिची दौऱ्यांवरील दडपणाचा सामना करण्याची मानसिक क्षमता आणि तयारीही जोखली जाईल. याशिवाय, मानसिक समस्येमुळे विराम घेणाऱ्या क्रिकेटपटूला जायबंदी क्रिकेटपटूप्रमाणेच वागवले जाईल. उदा. विरामादरम्यान उपचारांची पूर्ण जबाबदारी उचलणे, स्थिरावण्याची संधी देणे, भविष्यातील नियोजनात अशा क्रिकेटपटूंना प्रोत्साहनपर स्थान देणे इत्यादी.

ऑस्ट्रेलियाच्या या मानसिकदृष्टय़ा कणखर तटबंदीला फिलिप ह्य़ुजच्या दुर्दैवी मृत्यूनंतर खिंडारे पडायला लागली का, अशी एक शंका येते. इंग्लिश क्रिकेटपटूंना अनेकदा नैराश्य किंवा भयगंडाने ग्रासल्याचे दिसून आले आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या बाबतीत हे फारसे घडत नव्हते. ऑस्ट्रेलियातील शेफील्ड शील्ड सामना खेळत असताना, २५ नोव्हेंबर २०१४ रोजी फिलिप ह्य़ुजच्या मानेच्या वरील भागावर शॉन अबॉट या गोलंदाजाचा चेंडू आदळला. त्या आघाताने फिलिपच्या मेंदूत रक्तस्राव झाला आणि २७ नोव्हेंबर रोजी तो वारला. फिलिप मृत्युमुखी पडला, त्याच्या तीनच दिवसांनी त्याचा २६वा वाढदिवस साजरा झाला असता. या प्रसंगाने ऑस्ट्रेलियन क्रिकेट ढवळून निघाले. त्या घटनेच्या चौकशीदरम्यान, फिलिपवर त्या सामन्यात प्रतिस्पर्धी गोलंदाजांनी आखूड टप्प्याचे चेंडू आणि स्लेजिंगचा मारा त्याला विचलित करण्यासाठी केल्याचे स्पष्ट झाले. वास्तविक कोणत्याही मैदानावर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू याच प्रकारचे क्रिकेट खेळतात. पण अशा क्रिकेटने आपल्यातीलच एकाचा, फिलिप ह्य़ुजचा बळी घेतल्याची भावना तत्कालीन कर्णधार मायकेल क्लार्कसह अनेक आघाडीच्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या मनात घर करून राहिली. त्या धक्क्यातून ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा कणखर मुखवटा गळून पडला, हे स्पष्ट आहे. यानंतर त्यांचे दोन अत्यंत लाडके क्रिकेटपटू, स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे चेंडूत फेरफार करताना (बॉल टॅम्परिंग) सापडले आणि वर्षभरासाठी निलंबित झाले. या सगळ्या घटनांकडे पाहता एक बाब स्पष्ट होते, की ऑस्ट्रेलियासारख्या कणखर क्रिकेटपटूंनाही मानसिक समस्या भेडसावू शकतात. त्यांची वाच्यता हा कमकुवतपणा न मानता ते धाडस ठरवले जाणे हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट संस्कृतीचा भाग आहे. भारतातही असे मॅक्सवेल किंवा मॅडिन्सन सापडू शकतात. त्यांना आधार आणि बळ देण्यासाठी आपल्याकडील व्यवस्थाही सजग, संवेदनशील आणि तत्पर असली पाहिजे.
सौजन्य – लोकप्रभा