राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या वेंकट राहुल रगालाची कामगिरी देशाची मान उंचावणारीच ठरली आहे. मात्र ८५ किलो वजनी गटात सुवर्णपदकावर नाव कोरण्याचा त्याचा हा प्रवास सोपा नाही. वेंकट राहुल रगालाने वेटलिफ्टिंगची सुरुवात वयाच्या ८ व्या वर्षापासून केली. त्याने प्रचंड मेहनत करून आपले वेगळे स्थान गमावले. मात्र राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपर्यंत पोहचण्याचा त्याचा प्रवास अक्षरशः थक्क करणारा आहे.

राहुलचे वडील मधु रगाला यांनी वेंकट राहुल रगाला याला सुवर्णपदक मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. आईच्या जाण्याचे दुःख त्याने पचवले. ऑलिम्पिक स्पर्धा सुरु होण्याच्या काही दिवस आधीच राहुलची आई गेली. त्याचे त्याला दुःख झाले. मात्र या दुःखावर मात करून तो ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेण्यासाठी गेला. तसेच त्यानंतर त्याने राष्ट्रकुल स्पर्धांचीही तयारी सुरु केली. मला त्याच्या प्रशिक्षणासाठी माझी शेत जमीनही विकावी लागली पण त्याला वेटलिफ्टिंगमध्ये चॅम्पियन होताना पाहण्याचे माझे स्वप्न होते, त्याचमुळे त्याला सुवर्णपदक मिळाल्याचा खूप आनंद झाला असे मधु रगाला यांनी म्हटले आहे.

एवढेच नाही तर वेंकट राहुल रगालाला कावीळ झाली होती, ज्यामुळे त्याचे २० किलो वजन कमी झाले. पण तो त्यातूनही सावरला. त्याने जोमाने तयारी केली. कावीळ होणे कमी म्हणून काय तर त्याच्या गुडघ्यालाही दुखापत झाली. मात्र त्या वेदना विसरून वेंकट राहुल राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या तयारीला लागला. त्याचेच फळ आज त्याला मिळाले आहे. तो प्रचंड मेहनती आहे. त्याला मिळालेल्या पदकामुळे देशाची मान उंचावली आहेच शिवाय मला मनस्वी आनंद झाला आहे असे मधु रगाला यांनी म्हटले आहे. तेलंगणा टुडेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.