क्रिकेट क्लब ऑफ इंडियाशी (सीसीआय) माझ्या फार जुन्या आठवणी आहेत. अगदी हॅरिस शिल्डच्या अंतिम फेरीपासून ते कसोटी क्रिकेट सामन्यापर्यंत. सीसीआयमध्ये मला भरपूर प्रेम मिळालं आणि त्यामुळे या सन्मानाने मी भारावून गेलो आहे, असे उद्गार सचिनने ब्रेबॉर्न स्टेडियमच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्ताच्या सोहळ्यात काढले. सचिनला या वेळी ‘जागतिक क्रिकेटचा पहिला नागरिक’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सचिनने या वेळी ब्रेबॉर्नवरच्या आठवणींना उजाळा दिला. हॅरिस शिल्डची अंतिम फेरी, सीसीआयविरुद्धचे सामने, त्यानंतर सीसीआयने दिलेले सदसत्व, राजसिंग डुंगरपूर यांनी केलेले शिथिल नियम, मुंबई आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सराव सामना, आयपीएलचे सामने आणि आंतरराष्ट्रीय कसोटी सामना, या सर्व गतआठवणींमध्ये सचिन हरवून गेला.
या वेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन आणि भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर इंग्लंडचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांनाही सीसीआयचे सदस्यत्व बहाल करण्यात आले. या सोहळ्याला संपूर्ण भारतीय संघ उपस्थित होता, त्याचबरोबर इंग्लंडचे प्रशिक्षक अँडी फ्लॉवर, इंग्लंडचे फलंदाजी प्रशिक्षक व माजी कर्णधार ग्रॅहम गुच आणि इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक हेदेखील हजर होते.