News Flash

विदर्भाची यशोगाथा!

क्रिकेटच्या नकाशावर मागासलेल्या विदर्भात अचानक एवढी प्रतिभा कुठून आली, असाच काही प्रश्न क्रिकेटपंडितांना पडला.

(संग्रहित छायाचित्र)

आविष्कार देशमुख

विदर्भ क्रिकेट संघाने लागोपाठ दोन वेळा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. मात्र हे विजेतेपद पटकावण्यासाठी विदर्भाला तब्बल साठ वर्षांचा प्रदीर्घ काळ का लागला, हा खरा प्रश्न आहे. विदर्भ संघाचा सुरुवातीपासून आत्तापर्यंतचा एकंदरीत प्रवास बघितला तर या संघाला क्वचितच बाद फेरी गाठता आली आहे. मात्र गेल्या वर्षी विदर्भाने इंदूर येथील होळकर स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात पहिल्यांदाच करंडकावर मोहर उमटवून ऐतिहासिक कामगिरी केली. रणजीपाठोपाठ गेल्या वर्षी विदर्भाने पहिल्यांदाच इराणी चषकही आपल्या नावे करत अवघ्याच देशाचे लक्ष वेधले.

क्रिकेटच्या नकाशावर मागासलेल्या विदर्भात अचानक एवढी प्रतिभा कुठून आली, असाच काही प्रश्न क्रिकेटपंडितांना पडला. जे गेल्या सहा दशकांत झाले नाही ते एकाकी कसे झाले, तर त्यावर योगायोगाने हे विजेतेपद मिळाल्याची चर्चा क्रिकेटवर्तुळात सुरू झाली. मात्र यंदाच्या हंगामात लागोपाठ विजेतेपद पटकावून विदर्भाने त्या चच्रेला पूर्णविराम दिला. कर्णधार फैज फजलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या विदर्भ संघाने बलाढय़ संघाचा सक्षमतेने सामना करत परत एकदा करंडक उंचावला. जरी यंदाच्या मोसमात विदर्भाची सुरुवात निराशाजनक झाली असली तरी प्रत्येक गुण मिळवण्यासाठी विदर्भवीरांनी मेहनत घेतली. दर्जेदार प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनाचीही यात महत्त्वाची भूमिका होती. ‘लढा फक्त विजयासाठीच’ हाच त्यांचा जणू काही कानमंत्र होता.

विदर्भाच्या एकूणच रणजीच्या प्रवासाकडे जर प्रकाश टाकला तर जुल १९३४ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बठक घेऊन राष्ट्रीय स्तरावर रणजी करंडक स्पर्धा घेण्याचे जाहीर केल्यानंतर विदर्भ संघाने १९५७-५८ मध्ये पदार्पण केले. मात्र या स्पर्धेत मध्य विभागात खेळणाऱ्या विदर्भाने १९७०-७१ मध्ये अगदी पहिल्यांदा रणजी करंडक स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला होता. उपांत्यपूर्व फेरीत विदर्भाची लढत कोलकाता येथे २८ फेब्रुवारी ते १ मार्च १९७१ दरम्यान बंगालविरुद्ध झाली. मात्र सामना अनिर्णित ठरला, परंतु पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर बंगालने आगेकूच करत विदर्भाचे आव्हान संपुष्टात आणले. त्यानंतर विदर्भ संघात अनेक बदल होत गेले.

यानंतर तब्बल २५ वर्षांनी विदर्भाने १९९५-९६ मध्ये बाद फेरीत धडक दिली. उपांत्यपूर्व लढतीत विदर्भाची लढत सिकंदराबाद येथे २६ फेब्रुवारी ते १ मार्चदरम्यान हैदराबाद संघाशी झाली. मात्र हा सामनादेखील अनिर्णित ठरला आणि विदर्भाचे स्वप्न परत एकदा भंगले. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील सामने एलिट आणि प्लेट गटात घेणे सुरू झाल्यानंतर विदर्भाने २००२-०३ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत पहिल्यांदा प्लेट गटाच्या उपांत्य फेरीत धडक दिली. विदर्भ आणि कर्नाटक संघातील उपांत्य लढत २७ ते ३१ जानेवारी २००३ दरम्यान नागपुरात झाली. मात्र विदर्भाला गृहमदानाचा फायदा घेता आला नाही आणि कर्नाटक संघाकडून ४६५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे विदर्भाचे आव्हान परत एकदा संपुष्टात आले.

मग विदर्भाने २०११-१२ मध्ये बाद फेरी गाठली होती, परंतु प्लेट गटाच्या उपांत्य सामन्यात विदर्भ परत अपयशी ठरला. नागपूर येथे २१ ते २४ डिसेंबरदरम्यान झालेल्या सामन्यात विदर्भाने प्रथम फलंदाजी करत ५३१ धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादने चौथ्या दिवसअखेर ८ बाद ४६८ धावा केल्या. त्यामुळे सामना अनिर्णित राहिला, परंतु धावगतीत विदर्भ हैदराबादपेक्षा कमी ठरला. त्यामुळे चौथ्यांदा विदर्भ बाद फेरी गाठण्यास अपयशी ठरला.

वारंवार विदर्भ का अपयशी ठरतो, यावर विचारमंथन झाल्यावर व्हीसीएने व्यावसायिक दृष्टिकोन आत्मसात केला. २००८ मध्ये विदर्भ क्रिकेट असोसिएशनने (व्हीसीए) सिव्हिल लाइन्स येथील स्टेडियममध्ये निवासी अकादमीची स्थापन केली. जिल्हा पातळीवरील नवोदित खेळाडूंची निवड प्रक्रिया सुरूकेली आणि त्यातून वयोगटाप्रमाणे संघबांधणी सुरू झाली. अनुभवी आणि यशस्वी प्रशिक्षक नेमले. त्यापकी एक म्हणजे चंद्रकांत पंडित. पंडित अगदी शिस्तप्रिय आणि दूरदृष्टीचे. संघ कसा कसून बांधावा, यात त्यांचा हातखंड. मात्र अनेकांना घडवणाऱ्या पंडित यांची संघातील प्रतिमा म्हणजे ‘खडूस’. याच खडूस प्रशिक्षकाने विदर्भाला एक नव्हे तर सलग दुसऱ्याही वर्षी रणजीचा किताब मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली. अगदी अचूक रणनीती आखणारे पंडित यांनी विदर्भाला जे सहा दशकांत जमले नाही ते केवळ वर्षभरात करून दाखवले.

पंडित यांना व्हीसीएने हवे ते स्वातंत्र्य दिले. अगदी करारापूर्वीच पंडित यांनी ते स्पष्ट केले होते की माझी शैली जरा वेगळी आहे. मात्र, व्हीसीएने त्यांच्यावर विश्वास दर्शवला. पंडित यांना आणण्याचे संपूर्ण श्रेय व्हीसीएचे उपाध्यक्ष आणि माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू प्रशांत वैद्य यांना जाते. त्यामुळे एकंदरीतच विदर्भ क्रिकेट संघाकडे आता बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. तो पिछाडलेला विदर्भ आता विजेता म्हणून नावारूपाला आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2019 1:29 am

Web Title: vidarbha success story
Next Stories
1 इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा
2 IND v NZ : भारताच्या विजयात कृणाल पांड्याचं मोलाचं योगदान, केला अनोखा विक्रम
3 Video: DJ Bravo च्या नवीन गाण्यात धोनी-कोहलीचा जयजयकार
Just Now!
X