घरच्या मैदानावर विजेतेपदाचा दावेदार असलेला विदित गुजराथी या नाशिकच्या खेळाडूने आयुर्विमा चषक जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धेत विजयी प्रारंभ केला. त्याने पहिल्याच लढतीत भारताच्या रित्विझ परबला हरविले. नेदरलँड्सच्या रॉबिन व्हान काम्पेननेही विजयी सलामी केली.
पुण्याच्या हॉटेल हयात येथे सुरू झालेल्या या स्पर्धेत विदितला पहिल्या फेरीत सोपे आव्हान होते. त्याने परबवर केवळ २३ चालींमध्ये विजय मिळविला. परबला पांढऱ्या मोहरांनी खेळण्याचा फायदा घेता आला नाही. विदितने ई-५ खेळीने सुरुवात करताना थोडासा धोका पत्करला. १५व्या चालीला प्यादी पुढे नेण्याच्या प्रयत्नात परबला चालींवर नियंत्रण ठेवता आले नाही. प्रारंभपासूनच आक्रमक पवित्रा घेणाऱ्या विदितने आपलीही प्यादी पुढे नेण्यास सुरुवात केली. त्याच्या आक्रमणापुढे परबचा बचाव निष्प्रभ ठरला. अखेर २३व्या चालीला परबने पराभव मान्य केला.
विजयाची खात्री होती -विदित
पहिल्याच लढतीत भारतीय खेळाडू प्रतिस्पर्धी लाभल्यामुळे माझा आत्मविश्वास उंचावला. त्यामुळे ही लढत जिंकण्याची खात्री होती. साहजिकच मी थोडासा धोका पत्करून आक्रमक पवित्रा घेतला आणि सुदैवाने माझ्या योजनेनुसारच चाली झाल्या, असे विदित म्हणाला.
रॉबिन या डच खेळाडूनेही काळ्या मोहरांनी खेळतानाही कल्पक खेळ केला व स्वित्र्झलडच्या जॉन रिंदलिस्बेकर याच्यावर २८ चालींमध्ये सफाईदार विजय मिळविला. त्याने डावाच्या मध्यास प्यादी व मोहरांचा कल्पकतेने उपयोग केला. त्याच्या प्रभावी आक्रमक चालींपुढे जॉन याचा बचाव साफ कोसळला. लढतीनंतर रॉबिन म्हणाला, ‘‘कनिष्ठ गटात माझे हे शेवटचे वर्ष असल्यामुळे यंदा विजेतेपद मिळविण्याच्या ध्येयानेच मी सहभागी झालो आहे. माझी ही पहिलीच भारतभेट आहे. भारताविषयी खूप ऐकले होते. येथे आल्यानंतर दोन दिवसांतच मी भारतीय वातावरणाशी समरसून गेलो आहे. आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन संस्थेत मी शिक्षण घेत असताना तेथे अनेक भारतीय विद्यार्थ्यांशी माझी मैत्री झाली होती. त्यामुळे यंदा भारतात ही स्पर्धा होणार हे निश्चित झाल्यानंतर तेथे भाग घेण्याचा निर्णय मी घेतला होता.’’
सौम्या, प्रथमेशला समालोचनाची संधी
या स्पर्धेचे इंटरनेटद्वारे प्रक्षेपण होत आहे तसेच काही वाहिन्यांवरही त्याची क्षणचित्रे दाखविली जाणार आहेत. त्याकरिता माजी विजेती सौम्या स्वामीनाथन, प्रथमेश मोकल, सागर शहा, स्वाती घाटे, व्ही.सर्वानन यांना समालोचक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.
छोटासा सरीन स्पर्धेचे आकर्षण
भारताचा १० वर्षीय खेळाडू निहाल सरीन हा या स्पर्धेतील लक्षवेधक खेळाडू ठरला आहे. त्याच्या डावाकडे प्रेक्षकांप्रमाणेच अन्य स्पर्धकांमध्येही उत्सुकता दिसून आली.