भारत आणि इंग्लंडमध्ये विशाखापट्टणममध्ये दुसरी कसोटी सुरू आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानात टिच्चून फलंदाजी करणारा भारताचा कर्णधार विराट कोहली आपला सहकारी चेतेश्वर पुजारावर चांगलाच भडकला. दोघांची भागिदारी ऐन भरात आलेली असताना धावा काढताना पुजारा आणि कोहलीतील ताळमेळ बिघडत होता. दोनदा पुजारा धावबाद होता-होता वाचला. अखेर संयमी फलंदाजी करणाऱ्या कोहलीचा पारा चढला आणि त्याने पुजाराला सुनावले.

टीम इंडियातील खेळाडू एकामागोमाग एक बाद होत होते. त्यानंतर मात्र, कर्णधार कोहली आणि पुजारा यांच्यात ताळमेळ जमला. धावफलक हलता ठेवण्याचा निश्चय केलेला कोहली एक आणि दोन धावा काढण्यावर भर देत होता. सामन्यातील १८ व्या षटकात मात्र दोघांमधील ताळमेळ बिघडू लागला. याच षटकात तीनदा दोघांमधील ‘कॉल’ चुकला. याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर कोहलीने धाव घेतली. पण त्याचवेळी इंग्लिश खेळाडूनं झेप घेऊन चेंडू रोखला आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने फेकला. पण त्यावेळी अडखळत धाव घेत असलेला पुजारा धावबाद होता-होता वाचला. त्याच षटकात दोन धावा घेताना पुजाराच्या हातून बॅट निसटली. त्यावेळीही पुजारा थोडक्यात बचावला. अखेर विराट कोहलीचा पारा चढला. त्याने मैदानावरच पुजाराला सुनावले. इतके होऊनही पुन्हा एकदा तसाच घोळ झाला. यामुळे विराट खूपच चिडला होता. अखेर दोघांनी बराच वेळ एकमेकांशी चर्चा केली. त्यानंतर दोघांनीही कोणतीही चूक न करता सुंदर फटकेबाजी करून तडाखेबंद शतके ठोकली.