विराट कोहली जेव्हा जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा तो एक तरी विक्रम मोडतो. या सामन्यात विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा एक विक्रम मोडला आहे तर दुसऱ्या एका विक्रमाची बरोबरी त्याने केली आहे. विरोधातील संघाने दिलेले लक्ष्य पूर्ण करताना धावांचा यशस्वी पाठलाग करताना सर्वाधिक शतकांची नोंद सचिनच्या नावावर होती. सचिनने धावांचा यशस्वी पाठलाग करताना एकूण १४ शतके काढली होती. विराटने हा विक्रम मोडला आहे.

तसेच दुसऱ्या डावात सर्वाधिक शतके करण्याच्या सचिनच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली आहे. सचिनने दुसऱ्या डावामध्ये आतापर्यंत १७ शतके केली आहेत. त्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली आहे. सचिनला दुसऱ्या डावामध्ये १७ शतके काढण्यासाठी २३२ डाव खेळावे लागले होते तर विराट कोहलीने हा विक्रम केवळ ९६ धावांमध्ये बनवला आहे.

काल विराटने आपले २७ वे शतक बनवले. सर्वात कमी डाव खेळून त्याने २७ शतके बनवली आहेत. केवळ १६९ डावांमध्ये त्याने २७ शतके बनवली आहेत. २७ शतके बनविण्यासाठी सचिनला २५४ डाव खेळावे लागले होते, रिकी पाँटिंगला ३०८ डाव खेळावे लागले होते तर सनथ जयसूर्याला ४०४ डाव खेळावे लागले होते. २०१६ हे वर्ष विराट कोहलीसाठी यशस्वी गेले. एका कॅलेंडर वर्षात विराटने कसोटीमध्ये १२१५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियन क्रिकेट ११ या संघासाठी देखील विराट कोहलीची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली होती. तर ग्लेन मॅकग्राथने आपल्या कसोटी संघाचा कर्णधार म्हणून देखील विराट कोहलीची निवड केली होती.

पुण्यात झालेल्या सामन्यात इंग्लंडने भारताला ३५१ धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग कर्णधार विराटच्या नेतृत्वात भारताने केला. १०८ बॉलमध्ये १२२ धावा काढून विराटने कॅप्टन्स इनिंग खेळली. मागील वर्षात विराटने एकूण २,५९५ धावा काढल्या. त्यामध्ये कसोटीच्या तीन द्विशतकाचा समावेश आहे. विराट कोहलीने मागील वर्षी १० एकदिवसीय खेळांमध्ये ९२.३७ च्या सरासरीने ७३९ धावा काढल्या. काल झालेल्या सामन्यामध्ये केदार जाधवने १२० धावा करुन सामनावीराचा पुरस्कार पटकवला. या खेळीचे विराटने खूप कौतुक केले आहे. केदार जाधवचा खेळ कसा वाटला असे कुणी मला विचारले तर त्याचे उत्तर मी ‘एकमेवाद्वितीय’ असे देईल, असे विराटने म्हटले.