तिसऱ्या आणि अखेरच्या वन-डे सामन्यात भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. ३ वन-डे सामन्यांची मालिकाही इंग्लंडने २-१ अशी जिंकली. मात्र पराभवानंतरही भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर आणखी एक विक्रमाची नोंद करण्यात आलेली आहे. कर्णधार या नात्याने सर्वात जलद ३ हजार धावा करणारा कोहली पहिला फलंदाज ठरला आहे. डेव्हिड विलीच्या गोलंदाजीवर कोहलीने हा विक्रम आपल्या नावे केला आहे.

विराट कोहलीने केवळ ४९ डावांमध्ये हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हीलियर्सच्या नावावर सर्वात जलद ३ हजार धावांचा विक्रम जमा होता. डिव्हीलियर्सने ६० डावांमध्ये ही किमया साधली होती. तर सौरव गांगुलीने आपल्या कर्णधारपदाच्या काळात ७४ डावांमध्ये तर महेंद्रसिंह धोनीने ७० डावांमध्ये हा विक्रम केला होता.

अवश्य वाचा – सलग दुसऱ्या सामन्यात जो रुटचं शतक, ८ गडी राखून इंग्लंड विजयी; भारताने मालिकाही गमावली

हेडिंग्लेच्या मैदानाता भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा हाराकिरी केली. मात्र कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडच्या गोलंदाजांचा नेटाने सामना करत ७१ धावांची अर्धशतकी खेळी केली. कोहलीने कालच्या सामन्यात वन-डे कारकिर्दीतलं ४८ वं अर्धशतक झळकावलं. आदिल रशिदच्या गोलंदाजीवर कोहली त्रिफळाचीत होऊन माघारी परतला.

अवश्य वाचा – Video: टप्पा पडून आदिल रशिदचा चेंडू थेट यष्ट्यांवर, विराट कोहलीही अवाक