भारताचा कर्णधार विराट कोहली हा एक प्रतिभावंत खेळाडू आहे. आधुनिक क्रिकेटमध्ये तो सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. संघाचे नेतृत्व करायला सुरूवात केल्यापासून तर त्याचा खेळ अधिकच बहरला आहे. त्याने धडाकेबाज कामगिरी करत ७० आंतरराष्ट्रीय शतकं ठोकली आहेत. सचिननंतर असा पराक्रम विराटलाच करता आला आहे. आपल्या महत्त्वाच्या टप्प्यावर विराटने एक खास एडिट केलेला फोटो पोस्ट केला आहे.

विराटने २००८ साली क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्या सामन्यातील अगदी तरूणपणातला एक फोटो विराटने घेतला आहे. तसेच भारताने लॉकडाउन आधी खेळलेल्या न्यूझीलंड दौऱ्यातील कसोटी गणवेशातील फोटोही त्याने घेतला आहे. हे दोन फोटो अतिशय छान पद्धतीने मर्ज करून विराटने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोबाबत विशेष बाब म्हणजे विराटची ही इन्स्टाग्रामवरील हजारावी पोस्ट ठरली आहे.

खास फोटोखाली त्याने कॅप्शन लिहिली आहे, “२००८ – २०२०, क्रिकेटच्या प्रवासात मी रोज नवनवीन गोष्टी शिकतो आहे. या प्रवासात आतापर्यंत तुम्हा साऱ्यांचं प्रेम आणि पाठिंबा मिळाला यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. ही घ्या माझी इन्स्टाग्रामवरील १०००वी पोस्ट!” इन्स्टाग्रामवर अकाऊंट उघडल्यापासून विराटने अनेक प्रकारच्या पोस्ट केल्या आहेत. त्यापैकी आज केलेली पोस्ट ही त्याची १०००वी पोस्ट ठरली. सध्या विराटचे इन्स्टावर ६९.५ मिलियन फॉलोअर्स आहेत.