भारताचा कर्णधार विराट कोहली हा एक प्रतिभावंत खेळाडू आहे. आधुनिक क्रिकेटमध्ये तो सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. संघाचे नेतृत्व करायला सुरूवात केल्यापासून तर त्याचा खेळ अधिकच बहरला आहे. त्याशिवाय सोशल मीडियावरही विराट खूप लोकप्रिय आहे. विराटने नुकतीच इन्स्टाग्रामवर आपली १०००वी पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर आता विराटने घरबसल्या एक नवा विक्रम केला आहे.

विराटने इन्स्टाग्रामवर ७० मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. सध्या विराटचे ७०.२ मिलियन फॉलोअर्स आहेत. याचसोबत क्रीडाविश्वात विराटने चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. बास्केटबॉल खेळाडू लीब्रोन जेम्स याला विराटने मागे टाकत चौथा क्रमांक मिळवला आहे. 70 मिलियनचा टप्पा गाठणारा पहिलावहिला भारतीय असा विक्रम विराटने केला आहे. पोर्तुगालचा क्रिस्टीआनो रोनाल्डो क्रीडापटूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे २३२ मिलियन फॉलोअर्स आहेत. त्यापाठोपाठ अर्जेंटिनाचा लियोनल मेसी हा १६१ मिलियन फॉलोअर्ससह दुसऱ्या स्थानी आहे. तर ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमार ज्युनियर १४० मिलियन फॉलोअर्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

भारतीयांच्या यादीत विराट ७० मिलियनचा आकडा गाठणारा एकमेव व्यक्ती आहे. त्यापाठोपाठ बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही ५५ मिलियन फॉलोअर्स संख्येसह दुसऱ्या स्थानी आहे.

विराटची १०००वी इन्स्टाग्राम पोस्ट

विराटने २००८ साली क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्या सामन्यातील अगदी तरूणपणातला एक फोटो विराटने घेतला. तसेच भारताने लॉकडाउन आधी खेळलेल्या न्यूझीलंड दौऱ्यातील कसोटी गणवेशातील फोटोही त्याने घेतला. हे दोन फोटो अतिशय छान पद्धतीने मर्ज करून विराटने एक फोटो पोस्ट केला. ही फोटोपोस्ट विराटची इन्स्टाग्रामवरील हजारावी पोस्ट ठरली.