बेंगळूरु-पुणे समोरासमोर

नुकत्याच झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाची कसोटी ठरली होती. त्या मालिकेतील नित्यनव्या वादांमुळे क्रिकेटरसिकांचे लक्ष वेधणाऱ्या या झुंजार संघनायकांची आणखी एक जुगलबंदी रविवारी आयपीएलमध्ये पाहायला मिळणार आहे. यात कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु की स्मिथचा रायझिंग पुणे सुपरजायंट्स सरस ठरणार, याची चाहत्यांना विलक्षण उत्सुकता आहे.

बेंगळूरु आणि पुणे या दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेल्या संघांकडून आयपीएल सुरू होण्याआधी मोठय़ा अपेक्षा करण्यात आल्या होत्या. मात्र चारपैकी तीन सामने गमावणारे हे दोन्ही संघ सावरण्यासाठी उत्सुक आहेत.

दुखापतीतून सावरल्यानंतर अर्धशतकी खेळीसह पुनरागमन करणाऱ्या कोहलीमुळे बेंगळूरुचा आत्मविश्वास दुणावला होता. मात्र मुंबई इंडियन्सकडून विजयाचा घास निसटल्यामुळे हा संघ उत्तरार्धात निराश झाला. बेंगळूरुने दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध एकमेव विजय मिळवला आहे. दुसरीकडे पुण्याने डावाला उत्तम सुरुवात करूनसुद्धा गुजरात लायन्सविरुद्ध हार पत्करली होती. पुण्याने सलामीच्या सामन्यात मुंबईला हरवण्याची किमया साधली होती.

कोहली आणि स्मिथ हे जागतिक क्रिकेटमधील दोन अव्वल फलंदाज. संघाचा विजयाध्याय लिहिण्याची त्यांच्याकडे उत्तम क्षमता आहे. वैयक्तिक कामगिरीच्या बळावर संघाचा विजयालेख उंचावण्याची गुणवत्ता त्यांच्याकडे आहे. यंदाच्या हंगामात पुरेशा धावा करू न शकणाऱ्या माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवरसुद्धा धावांचे दडपण असेल.

पुणे आणि गुजरात हे यंदाच्या हंगामातील तसे झगडणारे संघ मानले जात आहेत. त्यामुळे बेंगळूरुला या दोन विजयांसह ४ गुण कमावून गुणतालिकेत आघाडी मिळवण्याची नामी संधी असेल. पुण्याच्या संघासाठीही हा विजय महत्त्वाचा असेल. पुणे त्यानंतर २२ एप्रिलला सनरायझर्स हैदराबादशी आणि २४ एप्रिलला मुंबई इंडियन्सशी सामना करणार आहे.

सॅम्युअल बद्रीच्या लाजवाब हॅट्ट्रिकनंतरही सामना निसटू शकतो, हा महत्त्वाचा धडा बेंगळूरुने मुंबईविरुद्धच्या सामन्यातून घेतला आहे. कोहलीला सूर गवसला असताना, स्फोटक फलंदाज ख्रिस गेल मात्र धावांसाठी झगडत आहे. मागील ११ डावांत त्याला एकदाच अर्धशतक साकारता आले आहे. त्यामुळे गेलला वगळण्याचा धाडसी निर्णय घेतल्यास शेन वॉटसनला संघात स्थान मिळू शकते.