* कोहलीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मांचा विश्वास
आंतराष्ट्रीय क्रिकेट स्तरावर पहिल्यांदा विराट कोहलीला भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. यावर कोहलीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी कोहली पहिल्यांदा संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे आणि मला विश्वास आहे तो कर्णधारपद उत्तमरित्या सांभाळेल. तसेच भारतीय क्रिकेटमधला पुढचा धोनी असल्याचेही तो सिद्ध करेल असे म्हटले आहे.
महेंद्रसिंग धोनीच्या पोटरीला दुखापत झाल्यामुळे त्याला वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या तिरंगी मालिकेतून माघार घ्यावी लागली. त्यामुळे विराट कोहलीकडे प्रभारी कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. कोहलीकडे भारतीय संघाचा भावी कर्णधार म्हणून क्रिकेट रसिक बघत आहेत. त्यामुळे तिरंगी मालिकेत कोहलीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा क्रिकेट रसिकांना आहे. “कोहलीकडे नेतृत्वक्षमता आहे तसेच भारताचा यशस्वी कर्णधार धोनीच्या सोबत खेळण्याचा अनुभवही त्याच्याकडे आहे आणि हाच अनुभव त्याला या मालिकेमध्ये उपयोगी ठरेल” असे राजकुमार शर्मा यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर “धोनीला झालेली दुखापत अतिशय दुर्भाग्यपुर्ण गोष्ट आहे. त्याची कमतरता भारतीय संघाला नक्की जाणवेल. धोनी एक महान कर्णधार आहे” असेही ते पुढे म्हणाले.