News Flash

खेळपट्टीवर गवत ठेवणार नाही!

विशाखापट्टणम्ची खेळपट्टी फिरकीला साजेशी असण्याची शक्यता आहे.

| November 15, 2016 02:47 am

विशाखापट्टणम मैदानाचे क्युरेटर कस्तुरी श्रीराम यांची भूमिका; फिरकीला पोषक खेळपट्टीची शक्यता

दुसऱ्या कसोटीसाठी खेळपट्टीवर गवत ठेवणार नसल्याचे स्पष्ट संकेत विशाखापट्टणम येथील मैदानाचे क्युरेटर कस्तुरी श्रीराम यांनी दिले आहेत.

घरच्या मैदानावर दमदार वर्चस्वासह विजय मिळवण्याची भारतीय संघाची परंपरा राजकोटमध्ये खंडित झाली. फलंदाजीला अनुकूल अशा खेळपट्टीवर इंग्लंडच्या फलंदाजांनी शतकी खेळी साकारल्या. खेळपट्टीवर थोडय़ा प्रमाणात असलेल्या गवताचा फायदा इंग्लंडच्या गोलंदाजांनी घेतला. राजकोट कसोटीच्या चौथ्या डावात भारतावर पराजयाचे संकट होते. कर्णधार कोहलीने चिवटपणे फलंदाजी करत पराभव टाळला. इंग्लंडने कसोटीत बहुतांशी कालावधीसाठी वर्चस्व राखले. हा अनुभव लक्षात घेऊन दुसऱ्या कसोटीसाठीच्या खेळपट्टीवर गवत न ठेवण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

दक्षिण आफ्रिका तसेच न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने जादुई गोलंदाजीच्या बळावर प्रतिस्पर्धी फलंदाजांना नामोहरम केले होते. न्यूझीलंडविरुद्धच्या नुकत्याच संपलेल्या मालिकेत अश्विनने २७ बळी घेतले होते. मात्र इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अश्विन सपशेल निष्प्रभ ठरला. खेळपट्टीकडून साथ न मिळाल्याने अश्विनची कामगिरी बहरली नाही. मात्र त्याच खेळपट्टीवर इंग्लंडच्या फिरकीपटूंनी संयमाने गोलंदाजी करत बळी मिळवताना धावाही रोखल्या. या पाश्र्वभूमीवर विशाखापट्टणम्ची खेळपट्टी फिरकीला साजेशी असण्याची शक्यता आहे.

‘खेळपट्टीवर गवत नसेल आणि दुसऱ्या दिवसापासून चेंडू वळायला सुरुवात होईल. संघव्यवस्थापकडून कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. तापमानात घट झाली आहे. मात्र दिवसभर प्रचंड उष्ण वातावरण होते. त्यामुळे खेळपट्टी काहीशी कोरडी झाली आहे’, असे श्रीराम यांनी सांगितले.

राजकोटप्रमाणे विशाखापट्टणम्च्या मैदानावरचा हा पहिलाच कसोटी सामना असणार आहे. काही दिवसांपूर्वी याच मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय मालिकेतील सामना झाला होता. न्यूझीलंडचा या सामन्यात ७९ धावांत खुर्दा उडाला होता.  रणजी करंडक स्पर्धेत राजस्थान आणि आसाम लढतीवेळेही या मैदानाची खेळपट्टी चर्चेत होती. राजस्थानने आसामला अवघ्या ६९ धावांत गुंडाळले होते. आसामचे प्रशिक्षक सुनील जोशी यांनी खेळपट्टीबाबत नाराजी व्यक्त केली होती. आंध्रप्रदेश क्रिकेट संघटनेचे सचिव गोकाराजू गंगाराजू यांनी खेळपट्टीबाबत सावध पवित्रा घेतला आहे. ‘दोन्ही संघांना समान मदत करेल अशी खेळपट्टी आम्ही तयार केली आहे. सामना निकाली होईल अशी आशा आहे. रणजी आणि कसोटीची खेळपट्टी यात फरक असेल.

भारत आणि न्यूझीलंड सामन्यावेळी खेळपट्टीत थोडा ओलसरपणा होता. मात्र खराब फटक्यांसह विकेट फेकल्याने न्यूझीलंडची घसरगुंडी उडाली. खेळपट्टीचा दोष नाही’, असे गंगाराजू यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 2:47 am

Web Title: visakhapatnam ground will befited spiners in test match
Next Stories
1 पाकिस्तान संघाचा न्यूझीलंड दौरा होणार
2 लुईस हॅमिल्टनची बाजी
3 पोर्तुगालच्या विजयात रोनाल्डो चमकला
Just Now!
X