नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनविरुद्ध लागोपाठ दुसऱ्यांदा विश्वविजेतेपदाची लढत गमावली असली तरी विश्वनाथन आनंदचा सूर संपलेला नाही, हे त्याने लंडन क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपदाला गवसणी घालून दाखवून दिले.
या स्पर्धेत पदक मिळविण्यासाठी आनंदला शेवटच्या डावात विजयाची आवश्यकता होती. त्याने ब्रिटिश ग्रँडमास्टर मायकेल अ‍ॅडम्सवर मात  केली.
आनंदबरोबरच व्लादिमीर क्रामनिक (रशिया) व अनीष गिरी (नेदरलँड्स) यांचेही सात गुण झाले. प्रगत गुणांकनाच्या आधारे आनंदला विजेतेपद मिळाले. गिरीने शेवटच्या फेरीत क्रामनिक याला बरोबरीत रोखले.
अमेरिकेचा हिकारू नाकामुरा हा संभाव्य विजेत्यांमध्ये मानला जात होता, मात्र त्याला शेवटच्या डावात इटलीच्या फॅबिआनो कारुआनाविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले. कारुआनाने हा डाव जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केले, मात्र नाकामुरा यानेही चिवट झुंज दिली. अखेर ८१ व्या चालीत डाव बरोबरीत सुटला.
आनंदला अ‍ॅडम्सने केलेल्या चुकांचा फायदा झाला. ३२ व्या चालीस वेळेच्या बंधनात चाली करण्याच्या प्रयत्नात अ‍ॅडम्सकडून चुकीची चाल खेळली गेली. त्याचा फायदा घेत आनंदने डावावर नियंत्रण मिळवीत ३६ व्या चालीत विजय मिळविला.