लागोपाठ दोन डाव गमावल्यानंतर विश्वनाथन आनंदचे विश्वविजेतेपद धोक्यात आले आहे. मात्र आनंदने सोमवारी आव्हानवीर मॅग्नस कार्लसनविरुद्धचा सातवा डाव बरोबरीत सोडवत विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतील आव्हान कायम राखले. सातव्या डावाअखेर कार्लसनने ४.५-२.५ अशी दोन गुणांची आघाडी कायम राखली आहे. मात्र विश्वविजेतेपद कायम राखण्यासाठी आनंदला उर्वरित पाच डावांत किमान दोन डाव जिंकावे लागतील आणि अन्य डाव बरोबरीत सोडवावे लागतील.
आनंदला सातव्या डावात पांढऱ्या मोहऱ्यांच्या साहाय्याने खेळण्याची संधी मिळाली होती. गेल्या दोन डावांत पराभव पत्करूनही आनंदची मानसिकता चांगली होती. बर्लिन बचाव पद्धतीच्या डावात कार्लसनने आनंदला डोईजड होऊ दिले नाही. त्याच्या या बचावतंत्राने आनंदला आतापर्यंत जेरीस आणले आहे.
आनंदने सातव्या डावात नेहमीप्रमाणे राजाच्या पुढील प्यादाने डावाची सुरुवात केली. त्याने पाचव्या चालीला प्रतिस्पध्र्याचा घोडा मिळविण्याचा प्रयत्न केला. आनंदने त्यानंतर रॉय लोपेझ पद्धतीने व्यूहरचना करण्याचाही प्रयत्न केला. मात्र आनंदच्या प्रत्येक आक्रमक चालीला कार्लसनकडे चोख उत्तर होते. १०व्या चालीला आनंदला आक्रमणासाठी योग्य व्यूहरचना मिळेल, अशी चिन्हे दिसत होती; पण कार्लसनने त्याचे हे प्रयत्न हाणून पाडले. १२व्या चालीला दोन्ही खेळाडूंनी कॅसलिंग केले.
आक्रमणासाठी आनंदने राजाच्या हत्तीपुढील प्यादे पुढे नेले. कार्लसनने त्या आक्रमणाला साजेसे उत्तर दिले. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी एकमेकांचे दोन्ही हत्ती घेतले. २६व्या चालीस दोन्ही खेळाडूंकडे प्रत्येकी एक वजीर, एक घोडा व सहा प्यादी अशी स्थिती होती. कार्लसनची दोन प्यादी एकाच रेषेत होती, त्याचा फायदा आनंदला घेता आला असता. आनंदला हे डावपेच करण्यासाठी थोडी जोखीम घ्यावी लागली असती, पण अगोदरच्या दोन डावांमधील पराभवामुळे आनंदने हा धोका पत्करण्याचे टाळले. त्याऐवजी त्याने डाव पुढे सुरू ठेवला. समान स्थितीमुळे डावात फारसे निष्पन्न होणार नाही, असे लक्षात आल्यानंतर आनंदने ३२व्या चालीला बरोबरीचा प्रस्ताव मान्य केला. आता पाच डाव शिल्लक राहिले असून आनंदला सहावे विश्वविजेतेपद पटकावण्यासाठी काही तरी कमाल दाखवावी लागणार आहे.

सातवा डाव जिंकता आला नसला, तरी पराभवाची मालिका संपुष्टात आल्यामुळे मला समाधान वाटत आहे. डाव जिंकण्यासाठी मी प्रयत्न करत होतो, पण कार्लसनचा भक्कम बचाव मला भेदता आला नाही.  राजाच्या बाजूने आक्रमण करण्याचा माझा विचार होता किंवा कार्लसनच्या व्यूहरचनेप्रमाणे बदल करणे हे दोनच पर्याय माझ्यापुढे होते. त्यामुळेच मी हत्तीच्या पुढील प्यादे पुढे नेत आक्रमणासाठी संधी मिळविण्याचा प्रयत्न केला.
विश्वनाथन आनंद

या डावाबाबत फारसे काही बोलण्यासारखे नाही. आम्ही यापूर्वी अनेक वेळा खेळलेल्या चालींनुसारच खेळ झाला. डावपेचांचे अनेक पर्याय उपलब्ध होते. माझ्या चालींवर मी समाधानी होतो. त्याने बरोबरीसाठी प्रयत्न केल्यानंतर मी लगेचच मान्य केले. दोन गुणांची आघाडी टिकवू शकलो, यातच मी समाधानी आहे. या आघाडीमुळे माझे मनोधैर्य उंचावले आहे.
मॅग्नस कार्लसन