‘‘दिल्ली न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे खूप आनंदी आणि दिलासादायक वाटते आहे. माझे कुटुंबीय, मित्र सारेच या निर्णयाची वाट पाहत होते, त्यामुळे आनंदाचे वातावरण आहे. खेळायला सुरुवात कधी करता येईल, याचीच मी आतुरतेने वाट पाहतो आहे. बीसीसीआय ज्या क्षणी माझ्यावरील बंदी उठवेल, तेव्हापासून मला खेळाला परत सुरुवात करता येईल,’’ असे मुंबईकर क्रिकेटपटू अंकित चव्हाणने न्यायालयातून निर्दोष मुक्तता झाल्यावर आपले मत व्यक्त केले.
आयपीएलच्या सहाव्या हंगामात स्पॉट-फिक्सिंगप्रकरणी राजस्थान रॉयल्स संघातील अंकितला दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर काही कालावधीने त्याची जामिनावर सुटका झाली. दिल्ली न्यायालयाला अंकितविरुद्ध सकृद्दर्शनी पुरावे न आढळल्याने त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
न्यायालयाच्या या निर्णयाविषयी अंकित म्हणाला की, ‘‘कुटुंबीय, मित्रपरिवार, पाठीराखे या सर्वानाच माझी निर्दोष मुक्तता होईल, हाच निर्णय अपेक्षित होता. कारण त्यांना माझ्यावर पूर्णपणे विश्वास होता. थोडा वेळ लागला, या प्रक्रियेमध्ये दोन वर्षे गेली. पण चांगला सकारात्मक निर्णय आला आहे. आता पुढे काय करायचे, याचा विचार मी करणार आहे.’’
मुंबईकडून रणजी स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर अंकितची राजस्थान रॉयल्स संघासाठी निवड झाली होती. राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली त्याने या संघाचे प्रतिनिधित्व केले होते. २०१३ साली अंकितला अटक करण्यात आली होती. त्यानंतर निकाल येईपर्यंतच्या आव्हानात्मक कालावधीविषयी अंकित म्हणाला की, ‘‘माझ्यासाठी फार कठीण असा हा कालखंड होता. एका क्रिकेटपटूला क्रिकेटपासून दूर राहणे, फारच अवघड असते, त्यामुळे हा कालखंड माझ्यासाठी नक्कीच चांगला नव्हता. ज्या गोष्टीसाठी आपण आयुष्य खर्ची घातले, मेहनत घेतली अशा आवडत्या गोष्टीपासून कोणत्याही माणसाला दूर ठेवले तर त्याच्यासाठी सारेच मुश्किल होऊन बसेल. पण माझे कुटुंबीय, मित्र, हितचिंतक सारे माझ्यासोबत होते, खासकरून माझ्या बायकोने मला या कालावधीत भरपूर पाठिंबा दिला. ती ठामपणे माझ्या पाठिशी उभे राहिली. मला या कालावधीमध्ये तिने सांभाळून
घेतले.’’
दिल्ली न्यायालयाने अंकितची निर्दोष मुक्तता केली असली तरी बीसीसीआयने मात्र त्याच्यावरील आजीवन बंदी उठवलेली नाही. याबाबत अंकित म्हणाला की, ‘‘बीसीसीआयच्या निर्णयाबद्दल सध्याच्या घडीला फार काही विचार केलेला नाही. सकारात्मक निर्णय दिल्ली न्यायालयाकडून आलेला आहे, माझ्या मते बीसीसीआय आपल्या निर्णयावर पुनर्विचार करू शकेल. त्याबद्दल माझ्या मनात सकारात्मक भावना आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे काही पदाधिकारी याबाबत बीसीसीआयला पत्र पाठवून विनंती करणार असल्याचे माझ्या ऐकिवात आले आहे. एमसीए माझ्या पाठीशी असल्याने नक्कीच आनंद आहे. एमसीएलाही तेवढाच विश्वास आहे, जेवढा माझ्या जवळच्या व्यक्तींचा आहे.’’
बीसीसीआयची बंदी उठल्यास अंकित पुन्हा एकदा मैदानावर परतू शकेल, याबाबत तो म्हणाला, ‘‘मैदानावर परतण्याच्या विचारानेच मला अतिशय आनंद झाला आहे, तो शब्दांत व्यक्त करता येऊ शकणार नाही. मैदानावर परतण्यासाठी मी उत्सुक आहे. जेवढय़ा लवकर मला मैदानात उतरता येईल, ते माझ्यासाठी चांगले असेल.