माजी कर्णधार एम.एस. धोनीला टी-२० मालिकेतून वगळण्यात माझा हात नव्हता. त्याला वगळण्याबद्दल मला काही माहिती नव्हते. हा सर्वस्वी निर्णय निवड समितीचा होता असा खुलासा भारताचा कर्णधार विराट कोहलीने केला आहे. विडिंजबरोबरच्या मालिका विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत तो बोलत होता. धोनीला विडिंज आणि ऑस्ट्रेलियाविरोधातील टी-२० मालिकेतून वगळल्यानंतर क्रीडा विश्वामध्ये आश्चर्य व्यक्त केले गेले होते. धोनीच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त करत निवड समितीवर सडकून टीका केली होती.

एका पत्रकाराने धोनीला टी-२०मधून वगळण्याबातचा प्रश्न विचारला. त्यावर विराट कोहलीने  उत्तर दिले. तो म्हणाला,  धोनीला टी-२० मध्ये वगळण्यात का आले याबाबत निवड समितीने आधीच सांगितले आहे. त्यामुळे पुन्हा त्याबाबत मी काय बोलणार. निवड समितीने नेमकं काय घडले याबाबतचा खुलासा आधीच केला आहे.

‘परिस्थिती समजून न घेता लोक काहीही बोलत राहतात, आणि त्यांना मी थांबवू शकत नाही. भारतीय संघाचा धोनी अविभाज्य घटक आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पंत निर्भिडपणे खेळतो. त्याला टी-२० सारख्या प्रकारामध्ये अधिकाधिक संधी मिळावी असे धोनीला वाटतेय, असे विराट कोहली म्हणाला.’ ‘धोनीचा नेहमी युवा खेळाडूंना संधी देण्याचा आणि मदत करण्याचा प्रयत्न असतो असेही विराट कोहली म्हणाला.’

वेस्ट इंडिजबरोबरच्या पाच एकदिवसीय सामन्याची मालिकेत भारताने ३-१ ने विजय मिळवला आहे. या मालिकेत विराट कोहलीला मालिकाविराचा पुरस्कार दिला आहे. भारताचा हा वेस्ट इंडिजविरोधातील आठवा तर भारताताली सलग सहावा मालिकाविजय होता.