कर्णधार विराट कोहलीचं शतक आणि गोलंदाजीत भुवनेश्वर कुमारच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने दुसऱ्या वन-डे सामन्यात ५९ धावांनी विजय मिळवला. भुवनेश्वर कुमारने ४ बळी घेत विंडीजच्या डावाला खिंडार पाडलं. पावसाने व्यत्यय आणल्यानंतर विंडीजच्या संघाला मूळ २८० धावांच्या लक्ष्याऐवजी २७० धावांचं लक्ष्य देण्यात आलं, मात्र विंडीजचा संघ २१० धावांपर्यंतच मजल मारु शकला. या सामन्यादरम्यान अखेरच्या षटकांमध्ये भुवनेश्वर कुमारने, आपल्याच गोलंदाजीवर रोस्टन चेसचा एका हातात झेल पकडत सामना भारताच्या बाजूने फिरवला.

भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजची सुरुवात अडखळत झाली होती. मात्र मधल्या फळीत एविन लुईस आणि रोस्टन चेस यांनी छोटेखानी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. लुईस माघारी परतल्यानंतर, रोस्टन चेस भारतीय गोलंदाजांना झुंजवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर चेंडू चेसच्या बॅटची कड घेऊन वर उडाला. भुवनेश्वरनेही प्रसंगावधान दाखवत आपल्या डाव्या बाजूला उडी मारत एका हाताने झेल पकडला.

तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला आहे. सध्या भारताकडे १-० अशी आघाडी आहे, त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या अखेरच्या वन-डे सामन्यात कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – Ind vs WI 2nd ODI : भारताची वेस्ट इंडिजवर ५९ धावांनी मात