यजमान न्यूझीलंडने भारतीय संघावर दुसऱ्या कसोटीत ७ गडी राखून विजय मिळवला. भारताने दिलेले १३२ धावांचे आव्हान न्यूझीलंडच्या फलंदाजांनी सहज पूर्ण केले. यामुळे वन-डे मालिके पाठोपाठ कसोटी मालिकेतही भारतीय संघाला पराभवाचं तोंड पहावं लागलं. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील भारतीय संघाचा हा पहिला मालिका पराभव ठरला. या बरोबरच विराटला आणखी एका लाजिरवाण्या प्रकाराला सामोरे जावे लागले.

भारताच्या खराब कामगिरीवर प्रचंड टीका करण्यात आली. या सामन्याच्या शेवटच्या डावात विराट खूपच आख्रमक पवित्र्यात दिसला. सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन जेव्हा बाद झाला, तेव्हा विराट कोहलीने काहीसा निराळ्या पद्धतीने जल्लोष साजरा केला. विल्यमसन बाद झाल्यानंतर विराटने न्यूझीलंडच्या स्टेडियमधील चाहत्यांकडे बघूनही काही हावभाव करत आनंद साजरा केला.

याशिवाय विराटच्या बाबतीत आणखी एक गोष्ट कानावर आली आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार विराट कोहलीने सामन्याच्या चौथ्या डावात न्यूझीलंडच्या संघाला दम भरला. विराट कोहली स्लिपमध्ये फिल्डिंग करत होता. त्यावेळी “हे (न्यूझीलंड) भारतात क्रिकेट खेळायला येऊ देत, मग यांना (क्रिकेटमधील माझी कामगिरी) दाखवतो”, असं विराट मैदानावर सहकाऱ्यांना बोलताना ऐकायला मिळाले. दरम्यान याबाबत विराटकडून कोणतीही टिपणी करण्यात आलेली नाही.

न्यूझीलंडने टीम इंडियाला अशी दिली मात

भारत आणि न्यूझीलंड यांचा पहिला डाव काहीसा बरोबरीत सुटल्यानंतर भारताचा दुसरा डाव न्यूझीलंडने १२४ धावांत गुंडाळला. त्यानंतर हनुमा विहारी, ऋषभ पंत, मोहम्मद शमी हे फलंदाजही एकामागोमाग एक माघारी परतले. रविंद्र जाडेजाने फटकेबाजी करत भारताला शतकी आघाडी मिळवून दिली. न्यूझीलंडला विजयासाठी मिळालेल्या १३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग सलामीवीरांनी अर्धशतके केली. लॅथमने ५२ आणि ब्लंडलने ५५ धावा केल्या. यानंतर अनुभवी रॉस टेलर आणि हेन्री निकल्स यांनी न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.