दुखापतीवर मात करून वेन रूनीने इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेत झोकात पुनरागमन केले. वेन रूनीने फ्री-किकवर केलेला गोल आणि रॉबिन व्हॅन पर्सीने मिळवून दिलेली आघाडी, अशा कामगिरीच्या जोरावर मँचेस्टर युनायटेडने इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये क्रिस्टल पॅलेस संघावर २-० असा आरामात विजय मिळवला. मँचेस्टर युनायटेडचे प्रशिक्षक डेव्हिड मोयेस यांचा ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावरील हा पहिला विजय ठरला.
लिव्हरपूलविरुद्धचा मँचेस्टर युनायडेटचा पराभव तसेच मोल्डोव्हा आणि युक्रेनविरुद्ध इंग्लंडच्या फिफा विश्वचषक पात्रता फेरीच्या सामन्यांना मुकलेल्या रूनीने या मोसमातील पहिला गोल झळकावत (८१व्या मिनिटाला) यशस्वी पुनरागमन केले. त्याआधी पहिल्या सत्राचा खेळ संपण्यास काही सेकंद शिल्लक असताना रॉबिन व्हॅन पर्सीने मँचेस्टर युनायटेडचे खाते खोलले होते. ४५व्या मिनिटाला क्रिस्टल पॅलेसचा मधल्या फळीतील फुटबॉलपटू कॅगिशो डिगाकोय याने युनायटेडच्या अ‍ॅशले यंग याला चुकीच्या पद्धतीने रोखल्याबद्दल डिगाकोयला पंचांनी लाल कार्ड दाखवत तंबूचा रस्ता दाखवला होता. मिळालेल्या पेनल्टीचा फायदा उठवत व्हॅन पर्सीने डाव्या पायाने मारलेला फटका थेट गोलजाळ्यात पोहोचला.
मोयेस यांनी एव्हरटनकडून करारबद्ध केलेल्या बेल्जियमच्या मारोउने फेलायनी याला ६१व्या मिनिटाला पदार्पणाची संधी दिली होती.

अर्सेनलचा ३-१ने विजय
आरोन रामसे याचे दोन गोल आणि ऑलिव्हियर गिरौडने केलेल्या एका गोलाच्या जोरावर अर्सेनलने संडरलँडवर ३-१ अशी मात करून गुणतालिकेत नऊ गुणांसह अव्वल स्थानी झेप घेतली. मँचेस्टर सिटी आणि स्टोक सिटी यांच्यातील लढत गोलशून्य बरोबरीत सुटली. टॉटनहॅम हॉटस्परने नॉर्विच सिटीचा २-० असा पराभव केला. दोन गोल करणारा गिल्फी सिगर्डसन टॉटनहॅमच्या विजयाचा शिल्पकार ठरला. हल सिटी वि. कार्डिफ सिटी तसेच फुलहॅम वि. वेस्टब्रूमविच अल्बियान यांच्यातील लढती १-१ अशा बरोबरीत सुटल्या. न्यूकॅसलने अ‍ॅस्टन व्हिलाचा २-१ असा पाडाव केला.