धीरज सिंह, भारताचा आणि एफसी गोवाचा गोलरक्षक

तुषार वैती

एफसी गोवाने बाद फेरीचे शिवधनुष्य पेलले असून, आता उपांत्य फेरीत मुंबई सिटी एफसीचे आव्हान परतवून लावण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. त्यामुळे यंदा एफसी गोवाला इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल)  विजेतेपदाचा मान मिळवून देऊ, असा निर्धार एफसी गोवाचा गोलरक्षक धीरज सिंह याने व्यक्त केला.

२०१७ मध्ये मायदेशात झालेल्या फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मणिपूरच्या धीरजने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. भारताला साखळी फेरीचा अडथळा पार करता आला नसला तरी धीरजच्या कामगिरीचे मात्र चाहत्यांनी कौतुक केले होते. भारतीय संघाचा आश्वासक खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धीरजशी यंदाच्या ‘आयएसएल’ तसेच गेल्या काही सामन्यांत अपराजित राहण्याची कामगिरी करणाऱ्या एफसी गोवाच्या कामगिरीविषयी केलेली ही खास बातचीत-

*  सध्या जैव-सुरक्षित वातावरणाची चर्चा खूप आहे, याबद्दलचा तुझा अनुभव कसा आहे?

जैव-सुरक्षित वातावरण हे फक्त खेळाडूंसाठीच नव्हे तर प्रत्येकासाठीच आव्हानात्मक आहे. करोनामुळे सध्या संपूर्ण विश्व संकटात सापडले आहे, तरीही जैव-सुरक्षित वातावरणात का होईना, ‘आयएसएल’ची यशस्वीपणे वाटचाल सुरू आहे, ही सर्वात आनंदाची बाब आहे. खेळाडू या नात्याने मैदानावर आम्हाला अधिकाधिक वेळ घालवावा लागतो. त्यामुळे मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आम्ही झटत असतो. जैव-सुरक्षित वातावरणाशिवाय अन्य कोणताही पर्याय नसला तरी आम्ही त्याच्याशी जुळवून घेतले आहे. हा कठीण असला तरी एक वेगळाच अनुभव आहे.

गोवा हे फुटबॉलचे नंदनवन समजले जात आहे, याबाबत तुझा अनुभव काय आहे?

गोव्याच्या भूमीत त्यांच्याच संघाकडून फुटबॉल खेळता आल्याचा अभिमान मला वाटत आहे. एफसी गोवाने आकर्षक आणि आक्रमक अशा फुटबॉलचे प्रदर्शन केल्याने आम्हा सर्वाकडूनच चाहत्यांच्या खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे कामगिरीत सातत्य राखण्याचा आमचा प्रयत्न असतो. आम्ही चांगला खेळ करावा आणि सामना जिंकावा, या चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. एफसी गोवाकडून हा माझा पहिलाच मोसम असल्याने मी माझ्या कामगिरीवर खूप मेहनत घेत आहे.

* एफसी गोवा संघाने बाद फेरीत स्थान मिळवले आहे, यापुढची तुमची रणनीती काय असेल?

साखळी फेरीच्या व्यग्र वेळापत्रकानंतर आता आम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा तंदुरुस्त राखण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्याच वेळेला आम्ही आगामी सामन्यांसाठी सज्ज होत आहोत. प्रशिक्षकाने आखलेली व्यूहरचना प्रत्यक्ष सामन्यादरम्यान कशी साकारता येईल, याकडे आमचे लक्ष लागलेले असते. उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्प्यात आम्ही मुंबई सिटी एफसीला कडवी लढत दिली. आता उपांत्य फेरीच्या परतीच्या सामन्यात विजय मिळवून अंतिम फेरी गाठण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

*  यंदा एफसी गोव्याला विजेतेपदाच्या कितपत आशा आहेत?

२०१५ आणि २०१८-१९ मध्ये आम्ही ‘आयएसएल’ची अंतिम फेरी गाठली असली तरी विजेतेपदाने आम्हाला कायमच हुलकावणी दिली आहे. गेल्या वर्षी आम्ही गुणतालिकेत अग्रस्थान पटकावले, पण आम्हाला अंतिम फेरी गाठता आली नाही. आता आम्ही चांगल्या लयीत असून मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सकारात्मक आणि आश्वासक अशी आमची कामगिरी होत आहे. निकालाचा आमच्यावर फारसा परिणाम होत नसून सर्वोत्तम खेळ साकारणे, हेच आमच्या हातात आहे. त्यामुळे यंदा आम्ही विजेतेपदाचा करंडक नक्कीच उंचावणार, असा विश्वास आहे.

*  एक युवा खेळाडू या नात्याने एफसी गोवा संघाच्या तुझ्याकडून काय अपेक्षा आहेत?

जानेवारी महिन्यात मी संघात सामील झाल्यानंतर चाहत्यांनी नेहमीच मला उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे. प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करून संघाला विजय मिळवून देणे, हे माझे वैयक्तिक ध्येय आहे. मी १०० टक्के योगदान द्यावे, अशी चाहत्यांची तसेच माझ्या संघाची अपेक्षा आहे. हे आव्हान पेलत प्रत्येक वेळी चांगला खेळ करण्याचे उद्दिष्ट मी बाळगले आहे.