|| ऋषिकेश बामणे

गौरव नाटेकर, माजी टेनिसपटू : – मुंबई : देशातील युवा पिढी टेनिसकडे वळत असली तरी त्यांना खऱ्या अर्थाने प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय खेळाडूंनी ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये अधिक चमकदार कामगिरी करणे महत्त्वाचे आहे. यामुळे टेनिसचाही प्रसार होण्यास हातभार लागेल, असे मत अर्जुन पुरस्कार विजेते भारताचे माजी टेनिसपटू गौरव नाटेकर यांनी व्यक्त केले.

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला सोमवारपासून प्रारंभ होत असून, यामध्ये भारताचे एकूण चार खेळाडू सहभागी होणार आहेत. सोनी क्रीडा वाहिन्यांवर या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून यंदाच्या हंगामातील ही पहिलीच ग्रँडस्लॅम स्पर्धा असल्याने जगभरातील नामांकित टेनिसपटूंसह भारतीय खेळाडू यामध्ये कशा प्रकारे छाप पाडतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर माजी राष्ट्रीय अजिंक्यपद विजेते नाटेकर यांच्याशी केलेली ही खास बातचीत-

’ ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅममध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंकडून तुम्हाला कितपत अपेक्षा आहेत?

ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेला मानाचे स्थान आहे. सुमित नागल तिसऱ्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळणार असून पुरुष एकेरीत भारताच्या त्याच्यावरच आशा टिकून आहेत. रॉजर फेडरर, डॉमिनिक थीम यांसारख्या खेळाडूंविरुद्ध खेळल्याने त्याचा आत्मविश्वास दुणावला आहे. यंदा तो किमान तिसऱ्या फेरीपर्यंत मजल मारू शकेल, असे मला वाटते. दुहेरीत रोहन बोपण्णा आणि दिविज शरण त्यांच्या विदेशी सहकाऱ्यांसह खेळणार आहेत, परंतु हे दोघेही अनुभवी खेळाडू असल्याने किमान उपांत्यपूर्व फेरी नक्कीच गाठू शकतील. त्याशिवाय अंकिता रैना प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या महिला दुहेरीत खेळणार असल्याने तिचा खेळ पाहण्यासाठी मी आतुर आहे. तिला महिला एकेरीच्या पात्रता फेरीचा अडथळा ओलांडण्यात अपयश आले असले, तरी एखाद्या खेळाडूने माघार घेतल्यास तिला नशिबाच्या बळावर एकेरीच्या मुख्य फेरीतही प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. देशामध्ये टेनिसचा अधिक प्रसार करायचा असल्यास ग्रँडस्लॅम स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करणे फार महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर माझ्यासह सर्व टेनिसप्रेमींचे नक्कीच लक्ष असेल.

’ करोना साथीच्या पार्श्वभूमीवर जैव-सुरक्षित वातावरणात खेळल्या जाणाऱ्या टेनिसविषयी तुमचे काय मत आहे?

करोनामुळे जगभरात सगळ्यांचेच नुकसान झाले आहे, परंतु खेळ टिकवण्यासाठी खेळाडूंनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. त्यामुळे पुढील काही काळ टेनिसपटूंनासुद्धा अन्य क्रीडापटूंप्रमाणे जैव-सुरक्षित वातावरणात राहण्याची तसेच खेळण्याची सवय करून घ्यावी लागेल. सर्वांसाठी विलगीकरणाचे नियम सारखेच असल्याने एखाद्या खेळाडूने तक्रार नोंदवून अथवा सुमार कामगिरीसाठी या वातावरणाला दोष देणे चुकीचे ठरेल.

’ देशातील टेनिसच्या पायाभूत सुविधांविषयी तुम्हाला काय वाटते?

गेल्या १०-१२ वर्षांच्या तुलनेत भारतातील टेनिसच्या पायाभूत सुविधांमध्ये खरेच सुधारणा झाली आहे. मात्र तरी शालेय स्तरावर नक्कीच सुधारणेला वाव आहे. अमेरिका, स्पेन, स्वित्झर्लंड या देशांतील खेळाडूंशी तसेच कार्यपद्धतीशी आपली तुलना करणे चुकीचे असले तरी १२ ते १६ वयोगटादरम्यानच खेळाडूंच्या तंत्रावर अधिक परिश्रम घेतले, तर आपल्या येथेही ग्रँडस्लॅम विजेते खेळाडू घडतील. या वयोगटातील खेळाडूंना योग्य मार्गदर्शन देण्याबरोबरच त्यांना पुरेसे आर्थिक पाठबळ लाभणेही गरजेचे आहे. त्यामुळे प्रशिक्षकांसह पालकांचीही या वाटचालीत मोलाची भूमिका आहे. त्याशिवाय राज्यामध्ये आता टेनिसच्या अकादम्या ठिकठिकाणी पाहायला मिळतात, परंतु या अकादम्यांमधून व्यावसायिक पातळीवरील खेळाडू उदयास येण्यासाठी प्रशिक्षकसुद्धा त्या दर्जाचेच असणे गरजेचे आहे, तरच भारतालाही ग्रँडस्लॅम विजेते खेळाडू गवसतील.

’ भारताची टेनिसमधील सद्य:स्थिती आणि युवा पिढीविषयी तुम्ही काय सांगाल?

केंद्र शासनाने आता टेनिस स्पर्धांच्या आयोजनाला परवानगी दिली असल्याने लवकरच देशांतर्गत टेनिस हंगामाला पुन्हा सुरुवात होईल, अशी आशा आहे. अखिल भारतीय टेनिस संघटनेला (एआयटीए) यापुढे स्पर्धांचे आयोजन करताना खेळाडूंच्या आरोग्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या तरी भारतातील टेनिस प्रगतीच्या वाटेवर असून येत्या काळात यामध्ये सुधारणा झाल्याचेच आपल्याला पाहायला आवडेल. नागल, प्रज्ञेश गुणेश्वरन, अंकिता यांसारख्या युवा फळीला लिएण्डर पेस, बोपण्णा, शरण यांच्या अनुभवाची साथ लाभत असल्याने पुढील काही वर्षे तरी भारतीय टेनिस सुरक्षित आहे, असे मला वाटते. टेनिस प्रीमियर लीग आणि खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांमधून भारताला अधिक गुणवान टेनिसपटू गवसले आहेत. खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्याबरोबरच फिजिओ, क्रीडा मानसशास्त्रज्ञ तसेच तंदुरुस्ती तज्ज्ञांची फळीही आता सज्ज असते. त्यामुळे आता फक्त खेळाडूंनी त्यांची कामगिरी अधिकाधिक उंचावून देशातील टेनिसला सर्वोच्च शिखरावर न्यावे, हीच माझी प्रबळ इच्छा आहे.