क्रिकेट जगतामध्ये वेस्ट इंडिजचे खेळाडू मैदानातील अनोख्या अंदाजाने लक्ष वेधून घेताना अनेकदा पाहायला मिळते. बळी मिळवल्यानंतर आनंद व्यक्त करण्याची त्यांची पद्धत म्हणजे अनोखा अनुभवच असतो. सध्या वेस्ट इंडिजचा संघ न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या फलंदाजाने पदार्पणातच क्रिकेटच्या मैदानात एका खराब विक्रमाची नोंद केली. सुनील अॅब्रुसने हिट विकेटने प्रतिस्पर्ध्यांना आयती विकेट बहाल केली.

क्रिकेटच्या मैदानात अशा पद्धतीने बाद होणारा तो पहिलाच फलंदाज आहे, असे नाही. मात्र, पदार्पणाच्या सामन्यात खराब आणि गोंधळलेल्या पद्धतीनं बाद होण्याचा प्रसंग ओढावलेला तो पहिलाच फलंदाज आहे. साहजिकच हा अनुभव तो कधीच विसरणार नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात धावफलकावर अवघ्या ८० धावा असताना वेस्ट इंडिजचे चार गडी बाद झाले होते. त्यानंतर सुनील अॅब्रुसनं खेळायला आला. कारकिर्दीतील पहिला चेंडू त्याने आत्मविश्वासाने टोलवला. मात्र, यष्टीला पाय लागल्यामुळे पंचांनी त्याला बाद दिले. न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या आक्रमक माऱ्यासमोर वेस्टइंडिजचा पहिला डाव ४५. ४ षटकात १३४ धावात कोलमडला.

त्यानंतर न्यूझीलंडने कॉलीनचे शतक आणि टेलरच्या दमदार खेळीच्या जोरावर पहिल्या डावात ९ बाद ४४७ धावांपर्यंत मजल मारली आहे. मालिकेतील सलामीच्या सामन्यावर न्यूझीलंडने मजबूत पकड मिळवली असून, सामना आपल्या बाजून करण्यासाठी वेस्ट इंडिजसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.