ड्वेन ब्राव्होची टीका
ट्वेन्टी-२० विश्वचषक पटकावल्यानंतरही वेस्ट इंडिजचा कर्णधार डॅरेन सॅमीने वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाच्या मनमानी कारभारावर जोरदार टीका केली होती. सॅमीच्या भूमिकेला पाठिंबा देताना अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने बोर्डावर टीकास्त्र सोडले आहे. ‘वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड सगळ्यात बेजबाबदार आहे. मानधनाच्या मुद्यावर बोर्ड आणि खेळाडू यांच्यात समेट होण्याची शक्यताही धुसर आहे’, असे ब्राव्होने सांगितले. बोर्डाचे अध्यक्ष डेव्ह कॅमेरुन अपरिपक्व व्यक्ती असल्याचेही ब्राव्हो म्हणाला.
‘बोर्डातील असंख्य व्यक्तीच खेळाडूंवर टीका करतात. आमच्या संघनिष्ठेवर ते सातत्याने आक्षेप घेतात. वेस्ट इंडिज क्रिकेटसाठी आम्ही समर्पित आहोत की नाही याविषयी त्यांना शंका वाटते. खेळाडू म्हणून आमच्यावर ओढवलेल्या परिस्थितीची बाहेरच्या लोकांना कल्पना येऊ शकत नाही. जगातील सगळ्यात बेजबाबदार बोर्ड वेस्ट इंडिजचे आहे’, असे ब्राव्होने सांगितले.
वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षांनी कर्णधार सॅमीसंदर्भात केलेली ट्विटर टिपण्णीवरही ब्राव्होने टीका केली आहे. तो म्हणाला, ‘बोर्ड अध्यक्षांच्या ट्विटचे मला जराही आश्चर्य वाटलेले नाही. त्यांच्याकडून अशाच वागण्याची अपेक्षा आहे. ते अतिशय अपरिपक्व व्यक्ती आहे. कठीण परिस्थिती कशी हाताळायची याची त्यांना जाण नाही. बोर्ड अध्यक्ष संकुचित विचारांचे आहेत.’
तो पुढे म्हणाला, ‘सॅमी विश्वचषक पटकावल्यानंतर जे बोलला ते मनापासून होते. त्याच्या बोलण्यात काहीही वावगे नाही. त्याच्या बोलण्याला संपूर्ण संघाचा पाठिंबा आहे. खेळाडूंना अनेकदा दुखावण्यात आले आहे. यापेक्षा आम्ही सहन करू शकत नाही. वेस्ट इंडिज क्रिकेटचे हित कशात आहे याची जाण नसलेली मंडळी क्रिकेट कारभार हाकत आहेत. मानधनाच्या मुद्यावरून बोर्ड आणि खेळाडू यांच्यात सामंजस्य होण्याची शक्यता नाही. परिस्थिती आणखी चिघळू शकते.